लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : शिवसेनेने शैलेंद्र वेलिंगकर यांना पणजीत उमेदवारी दिली असली तरी जर उत्पल यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली तर त्यांना पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. शिवसेनेचे गोवा प्रभारी खासदार संजय राऊत यांनी तसे स्पष्ट केले आहे.
शिवसेनेकडून ९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. म्हापसा मतदारसंघात जितेश कामत तर पणजी मतदारसंघात शैलेंद्र वेलिंगकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पेडणे मतदारसंघात सुभाष केरकर, शिवोली - विन्सेंट परेरा, हळदोणे- गोविंद गोवेकर, पर्ये- गुरुदास गावकर, वाळपई- देविदास गावकर, वास्को- मारुती शिरगावकर आणि केपे- आलेक्सी फर्नांंडिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना आपले दुसरी यादी लवकरच जाहीर करणार आहे.
उत्पल यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आमचा पणजीतील उमेदवाराची उमेदवारी मागे घेऊ असे ते म्हणाले. निवडणुका जिंकल्या नंतर अपक्ष म्हणून कायम राहू आणि भाजप पक्षाला पाठिंबा देणार नाही, असे उत्पल यांच्याकडून लिहून घेऊ असेही राऊत म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुतेक पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करून प्रचार सुरू केला आहे. भाजपचे अजून सहा उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. यात पणजी मतदारसंघात निर्माण झालेला तेढा कायम आहे. तेव्हा उत्पल अपक्ष लढणार तर आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
उमेदवारी जाहीर करताना खासदार अरविंद सावंत, मुंबईचे आमदार सुनील शिंदे, सुहास कांदे, गोवा संपर्क प्रमुख जीवन कामत, अमोल किर्तीकर व गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत यांची उपस्थिती होती.
राऊत म्हणाले की, उत्पलने अर्ज भरला, निवडणूक लढणार असा ठाम निर्णय घेतला तर आम्ही शिवसेनेची पणजी मतदारसंघातील उमेदवार मागे घेऊ. आता उत्पल यांनी निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. विखुरलेला विरोधी पक्ष भाजपची ताकद आहे. पण भाजपने फार संभ्रमात राहू नये, असेही ते म्हणाले.
राज्य विधानसभा निवडणूक अर्ज भरण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे. त्यामुळे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीखही अजून दूर आहे. त्यामुळे या काळात आणखी काही मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
शिवसेना राज्यातील कोणत्या भागात उमेदवार उभे करणार आहेत, याविषयी मतदारांतही उत्सुकता आहे. त्यातच शिवसेना गोवा प्रभारी राऊत यांनी उत्पल पर्रीकर यांच्यासाठी सेनेचा उमेदवार पणजीतून लढणार नसल्याची घोषणा केली आहे. शिवाय यापूर्वी भाजपविरोधकांनी उत्पल पर्रीकर अपक्ष लढल्यास त्यांना पाठिंबा देण्याचे आव्हान केले होते.
दऱम्यान, उत्पल यांनी पणजीतून अपक्ष उमेदवारी दाखल केल्यास त्यांना कोणकोणत्या पक्षांचा पाठिंबा लाभतो, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मतदारांबरोबरच राजकीय निरीक्षकांचेही लक्ष राजधानीतील मतदारसंघातील घडामोडींवर आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पणजीतील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उत्पल यांच्या पुढील भूमिकेकडेही लक्ष लागून राहिले आहे.