पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Goa Election 2022) भाजपने आपली पहिली ३४ उमेदवारी यादी जाहीर केली आहे. मात्र, यानंतर आता भाजपने उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना पणजीतून उमेदवारी नाकारल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला लागल्या असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, गोवा विधानसभा निवडणूक लढवायची की नाही हे उत्पल पर्रिकर यांच्यावर अवलंबून आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपने गोव्यातील ४० पैकी ३४ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंग यांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने उत्पल पर्रिकर यांना पणजीतून उमेदवारी दिली नाही. यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
निवडणूक लढवावी की नाही हे उत्पल पर्रिकर यांच्यावर अवलंबून
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांनी, गोवा विधानसभा निवडणूक लढवायची की नाही हे त्यांच्या अवलंबून आहे. गोव्यात भाजपच्या स्थापनेत त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मनोहर पर्रिकर यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. गोव्यात भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.
इतर दोन मतदारसंघाचे पर्याय दिले आहेत
पणजी मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदारांनाच तिकीट देण्यात आले आहे. उत्पल पर्रिकर यांना आम्ही भाजपकडून तिकीट देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना आम्ही इतर दोन मतदारसंघाचे पर्याय दिले आहेत. त्यापैकी एक पर्याय त्यांनी नाकारला आहे. पण दुसऱ्या पर्यायाबाबत त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. मला असे वाटते की दुसऱ्या पर्यायाबद्दल ते सकारात्मक उत्तर देतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच आम्हाला मनोहर पर्रिकर यांच्याविषयी आणि त्यांच्या परिवाराविषयी नितांत आदर आहे. उत्पल पर्रिकर असोत किंवा दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्यात परिवारातील कोणताही सदस्य असो, ते सर्व जण आमच्या परिवाराचा भाग आहेत. पर्रिकर परिवार हा भाजप परिवाराप्रमाणेच आहे. ते सर्व जण आमचे अगदी जवळचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपने वापरा आणि फेकून द्या या धोरणानुसार पर्रिकर कुटुंबीयांचा वापर केला, गोव्यातील लोकांनाही याचे दु:ख आहे. मी नेहमीच मनोहर पर्रिकर यांचा आदर करतो. उत्पल यांचे आम आदमी पक्षात स्वागत आहे, त्यांनी आपच्या तिकीटावर गोव्यातून निवडणूक लढवावी, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.