पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार असून, त्याबाबतची रणनीती आखण्यासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल गोव्यात आले आहेत. गोव्यातील आजची स्थिती पाहता, गोवा त्रिशंकूकडे जात आहे. मात्र, राष्ट्रवादीसोबत आम्ही काही जागा नक्की जिंकू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
गोव्यातील आजची परिस्थिती त्रिशंकू विधानसभेकडे चालली आहे. राष्ट्रवादीसोबत आम्ही आमच्या काही जागा जिंकून आणू. आम्ही जर काही जागा जिंकू शकलो तर सरकारमध्ये आमचे स्थान असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने खास रणनिती तयार केली आहे. राष्ट्रवादीसोबत जागा वाटप करताना शिवसेनेने काही महत्त्वाच्या परिसरातील जागांवरच लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जागा घेताना महाराष्ट्राच्या लगतच्या मतदारसंघातील जागाच घेतल्या आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
आमच्यात मतदारसंघावरून वाद नाही
म्हापसा, वाळपई, मये, पराये असे जे महाराष्ट्राच्या लगतचे मतदारसंघ आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे उमदेवार उभे राहतील. मुंबईतील कार्यकर्ते आणि गोव्यातील कार्यकर्ते काम करणार आहेत. आमच्यात मतदारसंघावरून वाद नाही, असे सांगत गोव्यातील चित्र धुसर आणि अस्पष्ट आहे. प्रत्येक राजकीय पक्ष देशातील त्याने गोव्याची प्रयोग शाळा केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येऊन बसले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आला आहे. तृणमूलचे प्रमुख बसले आहेत. आमचे देवेंद्र फडणवीसांचा तंबू इथे पडला आहे. काँग्रेस आहे. शिवसेना तर आहेच. लढू आणि जिंकू, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणूक निकालाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजप क्रमांक एकचा विरोधी पक्ष ठरला आहे. इतरही विरोधी पक्ष आहेत, पण भाजप पहिल्या क्रमांकावर असून, नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी त्यांचे स्थान कायम ठेवल्याबद्दल अभिनंदन करतो. अशीच लढाई हा क्रमांक कायम ठेवण्यासाठी लढच राहा अशा मी शुभेच्छा देतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एकत्रित बेरीजच करावी लागेल आणि ही बेरीज बरीच पुढे आहे, असे ते म्हणाले.