पणजीः गोव्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती करणार आहेत. शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युती करणार असल्याचं जाहीर केलं.
"शिवसेना व राष्ट्रवादीची महाराष्ट्रात आघाडी आहे आणि ती गोव्यातील निवडणुकीतही लढणार आहे," असं संजय राऊत यांनी सांगितलं. काँग्रेसही महाराष्ट्रात आघाडीचा घटक आहे त्यामुळे गोव्यातही त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा होती, परंतु दुर्दैवाने काँग्रेसने त्या बाबतीत प्रयत्न केले नाहीत असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. सेना - राष्ट्रवादी गोव्यात १० ते १२ जागांवर लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी दिली.
काँग्रेसशी चर्चा नाहीगोव्यात काँग्रेसचे १५ आमदार त्यांना सोडून गेले असतानासुद्धा काँग्रेसला अजून ते स्वबळावर निवडणूक जिंकू शकतात, असं वाटतं. काँग्रेसने आम्हाला जागा देण्याबाबत काहीच पावलं उचलली नसल्यानं यापुढे काँग्रेसशी युतीबाबत चर्चा करून काहीच उपयोग नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची गोव्यात चांगल्या संख्येनं उमेदवार देण्याची क्षमता असल्याचं यापूर्वी प्रफल्ल पटेल म्हणाले होते.