पणजी: गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. उत्पल पर्रिकर यांच्या बंडखोरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारून त्यांचा अपमान केला आहे. भाजपने उत्पल पर्रिकर यांचा केलेला हा अपमान गोवेकर विसरणार नाहीत, या शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
पणजीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. उत्पल पर्रिकर यांची वेदना समजून घेऊ शकतो. ज्या पक्षात त्यांचा जन्म झाला, तो पक्ष सोडताना किंवा त्या पक्षापासून दूर जाताना कशा वेदना होतात, हे त्यांच्या चेहऱ्यावर अनुभवलेले आहे. नक्कीच आमच्या सगळ्यांच्या त्याना शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
भाजपने उत्पल पर्रिकरांचा केलेला अपमान गोवेकर विसरणार नाहीत
उत्पल पर्रिकर हे अपक्ष लढताय ही चांगली गोष्ट आहे. भाजपाने हे त्यांच्यावर थोपवले आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्याचे एक असे नेते होते, ज्यांनी गोव्याचे नाव देशभरात उंचावले होते. राजकीय चारित्र्य कसे असले पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले होतं. परंतु त्यांच्या मुलाला ज्या पद्धतीने गोव्यात, देशाच्या राजकारणात अपमानित केले गेले. हे गोवाच्या जनतेला पटलेले नाही. आता उत्पल पर्रिकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आता लढाई होईल बेईमान विरुद्ध चारित्र्य. उत्पल यांच्यासमोर पणजीत, भाजपने अशा व्यक्तीला उमेदवार बनवले आहे, ज्याच्यावर भ्रष्टाचार, माफियागिरी, बलात्कार, असे सगळेच आरोप त्याच्यावर आहेत. आश्चर्याची बाब आहे, पंतप्रधान मोदी, अमित शाह येतील प्रचाराला. देवेंद्र फडणवीस तर तिथेच बसलेले आहेत. मग आता उत्पल पर्रिकर आणि हे सगळेजण असा सामना होईल, असे संजय राऊत म्हणाले.
डिपॉझिट गेले तरी आम्ही लढत राहू. बचेंगे तो और भी लढेंगे
डिपॉझिट गेले तरी आम्ही लढत राहू. बचेंगे तो और भी लढेंगे. भाजपाचे नेते म्हणत आहेत की गोव्यात शिवसेनेचे डिपॉझिट वाचणार नाही. १९८९ पासून भाजप गोव्यात काम करतोय आणि सलग दोन निवडणुकात त्यांचे डिपॉझिट गेले होते. डिपॉझिट गेले म्हणून निवडणुका लढायच्याच नाहीत, असे नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे, पक्षाचा विस्तार करायचा आहे. गोव्या सारख्या राज्यात पक्ष वाढवण्यासाठी अशा निवडणुका लढाव्या लागतात. पण यावेळी तर चित्र वेगळे आहे. डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.