Goa Election 2022, Shivsena vs Congress: "राहुल अन् प्रियंका गांधींकडून मला आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल"; संजय राऊतांनी लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 01:00 PM2022-01-22T13:00:18+5:302022-01-22T13:01:05+5:30
गोवा निवडणुकीत काँग्रेसशी युती करण्यासाठी आग्रही असणाऱ्या संजय राऊतांनीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची खिल्ली उडवली.
Goa Assembly Election 2022: गोव्याच्या निवडणुकीत काँग्रेसशी युती करण्यासाठी आग्रही असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच, त्यांनी काँग्रेसच्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची खिल्ली उडवली. 'मला राहुल आणि प्रियंका यांच्याकडून आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल', असा खोचक टोला त्यांनी लगावला. तसेच, गोव्यात भाजप जिंकले तर त्याला काँग्रेसच जबाबदार असेल, असेही रोखठोक विधान राऊत यांनी केलं.
"मी राहुल गांधी आणि प्रियंका यांच्याशी भरपूर वेळा बोललो, पण त्यांना आमचं म्हणणं समजतच नाहीये. काँग्रेस एकटं लढण्याच्या तयारीत आहे. हा आत्मविश्वास त्यांच्यात कुठून येतो हेच समजत नाही. तसं असेल तर मला त्यांच्याकडून आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल कारण त्यांना असं वाटतंय की ते एकटे गोव्यात बहुमताने विजयी होतील", असा टोला राऊतांनी लगावला.
'गोव्यात भाजपचा विजय झाला, तर त्याला काँग्रेसच जबाबदार असेल', असे राऊत म्हणाले. 'आम्ही काँग्रेसशी चर्चा केली, पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही 'महाविकास आघाडी' करण्याचा प्रयत्न केला, पण स्वबळावर बहुमत मिळू शकेल असे काँग्रेस नेत्यांना वाटते', असं राऊत म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी भाजपवरही टीका केली. "मनोहर पर्रीकर हे गोव्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख संस्थापक होते. त्यांनी कष्ट केले. आज त्यांच्या मुलावर त्यांच्याच भाजपच्या दारामध्ये भीक मागायची वेळ यावी हे दुर्दैवी आहे. अशाप्रकारे भाजपला कन्व्हिन्स करायची वेळ आल्याने कंटाळून त्यांनी भाजपचा त्याग केला. त्यांच्या वेदना मी समजू शकतो. ज्या पक्षात त्यांचा जन्म झाला, तो पक्ष सोडताना अशा वेदना होतात. त्या मी त्यांच्या चेहऱ्यावर पाहिल्या. पण आमच्याकडून त्यांना शुभेच्छा", असं राऊत म्हणाले. तसेच, भारतीय जनता पार्टीने पहिल्या यादीत जी ३४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, त्या सगळ्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट शिवसेनेजवळ आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.