लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : निवडणूक निकालानंतरसुध्दा भाजपकडे मुळीच युती करणार नाही, असे मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, २०१७ साली पर्रीकर यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या अटीवरच आम्ही सरकारला पाठिंबा दिला होता. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री बनविण्यास आमचा मुळीच पाठिंबा असणार नाही.
पत्रकार परिषदेत सुदिन म्हणाले की, पार्सेकर यांनासुध्दा आम्ही मुख्यमंत्री म्हणून कधी पाठिंबा दिलेला नाही. मगोप-तृणमूल युतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा येत्या १० तारखेपर्यंत जाहीर होईल, असे एका प्रश्नावर सुदिन यांनी सांगितले. मगोप आणि तृणमूलची टीम एकत्रितपणे हा निर्णय घेणार आहे, असे सुदिन यांनी स्पष्ट केले.
भाजप समृध्दीच्या गोष्टी करीत आहे. आज राज्यात जे काही चालले ते पाहता ही समृध्दी नव्हे तर चोरीचा धंदा आहे. या सरकारने नोकऱ्या विकल्या. अनेक अपव्यवहार केले. पुढील १५ दिवसांत या सर्व प्रश्नांवर सरकारला आम्ही उघडे पाडू. सरकारच्या कारभाराविरोधात आवाज उठवणार असून मगोप-तृणमूल युतीबाबत कोणीही अपप्रचार करु नये, आम्ही एकसंध आहोत, असेही ते म्हणाले.
गोमंतकीय जनतेला विकासाचा बागलबुवा दाखवला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात हे प्रकल्प सरकारमधील नेत्यांसाठी कमिशन देणारे ठरले आहेत. सत्तेवर येताच या कारभाराची आम्ही चौकशी करून त्यांचे खरे रूप जनतेसमोर आणू, असेही ढवळीकर म्हणाले.
पणजीबाबत दोन दिवसांत निर्णय
ढवळीकर म्हणाले की, पणजीत युतीने उमेदवार दिलेला नाही. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा का, याबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. तृणमूल आणि मगोपने संयुक्तपणे ३९ उमेदवार दिलेले आहेत. पणजीबाबत संयुक्तपणे निर्णय घेतला जाईल.
खाणींबाबत दिशाभूल नको
भाजपला आणखी दहा वर्षे खाण व्यवसाय सुरू करणे शक्य नाही, त्यामुळे खोट्या आश्वासनांना बळी पडू नका, असे आवाहन ढवळीकर यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी जाहीर सभेत खाण व्यवसाय लवकरच सुरु करणार असे आश्वासन दिले होते. त्याबाबत ढवळीकर म्हणाले की, २०१२ साली भाजप सरकार सत्तेवर असताना खाणी बंद का केल्या याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे. भाजपचे सरकार सत्तेवर असताना खाणी सुरु झाल्या नाहीत.