लोकमत न्यूज नेटवर्क
डिचोली : येथील भाजप उमेदवारीचा गुंता अखेर सुटला असून सभापती राजेश पाटणेकरच येथून लढणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पाटणेकर यांची समजूत काढल्यानंतर पाटणेकर उमेदवारी भरण्यास राजी झाले आहेत. पाटणेकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा पक्षाकडून आज केली जाणार आहे.
मुख्यमंत्री सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे यांची काल पाटणेकर यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी प्रभारी महेश जाधव तसेच नगराध्यक्ष कुंदन फळारी, सतीश गावकर, मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, वल्लभ साळकर, अरुण नाईक, तुळशीदास परब, अभिजित तेली, अनिकेत चणेकर, सुदन गोवेकर, दीपा शिरगावकर आदी उपस्थित होते.
मंडळ समितीचे सदस्य उपस्थित होते. चर्चेवेळी सावंत यांनी पाटणेकर यांनीच लढावे असा आग्रह धरला. त्यानंतर पक्षाच्या इच्छेखातर आपण रिंगणात उतरू असे पाटणेकर यांनी सांगितले. यावेळी डॉ. सावंत व तानावडे यांनी हार घालून पाटणेकर यांचे अभिनंदन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.