पणजी : ‘हिंदी खबर’ या वृत्त वाहिनीने गोव्यात तीन दिग्गज उमेदवारांचे कथित स्टिंग ऑपरेशन केला आहे. या कथित स्टिंगमध्ये काँग्रेसचे संकल्प आमोणकर, आवेर्तानो फुर्तादो व सावियो डिसिल्वा तर तृणमूलचे चर्चिल आलेमाव हे एक ते तीन कोटींचा सौदा करत असल्याचा दावा वृत्त वाहिनीने केला आहे. एवढेच नाही तर त्यासाठी निवडून आल्यावर पक्ष बदलून भाजपमध्ये जाण्याची तयारी ते दाखवत असल्याचे या वृत्त वाहिनीच्या कथित स्टिंगमध्ये कैद झाल्याचे दाखवण्यात आले आहे.
या कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये गोव्यात दीड महिन्यांपासून डेरे दाखल झालेला विशाल शेखर नामक पत्रकार या चारही उमेदवारांना भेटून स्वत:ला उद्योजक ग्रुपचा माणूस असल्याचे सांगतो. सरकार आल्यानंतर फायदा करून देण्यासाठी त्यापूर्वीच पैसे देण्याचा सौदा करतो. चर्चिल आलेमाव यांना ३ कोटी, संकल्प आमोणकर २, आवेर्तिनो फुर्तादोंना ३ तर सावियो डिसिल्वांना ३ कोटीची ऑफर देण्यात येत असून त्यांनी ही ऑफर स्वीकारल्याचा दावाही संबंधित वृत्त वाहिनीने केला आहे.
व्हिडिओ बनावट असल्याची तक्रार
काँग्रेससह तृणमूलनेही स्टींग ऑपरेशन फसवे असल्याचा आरोप करतानाच निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून तक्रार करत बोगस व्हिडिओ असल्याचा दावाही केला.
चर्चिल आलेमाव ४ कोटी
माझे दोन आमदार निवडून येतील. मी आणि माझी मुलगी. कोणत्याही परिस्थितीत आम्ही मंत्री होणार. भाजप जरी सरकार बनवत असेल तरी त्यात आम्ही मंत्री असू.
संकल्प आमोणकर १ कोटी
गोव्यात उद्योगासाठी खूप संधी आहेत. यावेळी काँग्रेस सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यास मी ज्येष्ठ नेता असल्यामुळे मंत्री होणारच. काँग्रेस सत्तेत आली नाही आणि भाजप सत्तेवर आला तरी मला त्या सरकारात मंत्री बनण्यास काहीच हरकत नाही. तुमची रिकवरी होईल. माझ्याबरोबर तुम्ही दिगंबर कामत यांनाही संपर्क करू शकतात. मीही तुमच्या वतीने त्यांच्याशी बोलेन.
सावियो डिसिल्वा ३ कोटी
आमचेच सरकार येणार. नाही आले तरी मी मंत्री बनणारच. मी हमी देतो ना याची.
आवेर्तान फुर्तादो ३ कोटी
निवडून आल्यावर मी मंत्री होणार. भाजप जरी सत्तेवर आला तरी भाजपशी माझे संबंध चांगले आहेत. मी त्या पक्षाच्या सरकारात असेन. ‘तीन द्या’