प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क
म्हापसा : विधानसभेच्या दुसऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्च करण्याची मर्यादा ५ हजार रुपये होती. मात्र, त्याकाळात थिवी मतदारसंघातून मगोपच्या उमेदवारीवर निवडून आलेले तत्कालीन आमदार दिवंगत जयसिंगराव आबासाहेब राणे यांनी निवडणुकीत फक्त २५५ रुपये खर्च केले होते. आज उमेदवारांना खर्च करण्याची मर्यादा २७ लाख रुपये करण्यात आली आहे. तरीसुद्धा ही खर्चाची मर्यादा अनेकदा ओलांडली जाते. त्यामुळे उमेदवारांकडून मर्यादा वाढविण्याची मागणीही केली जाते.
दिवंगत जयसिंगराव राणे यांनी उमेदवार या नात्याने केलेल्या खर्चाची नोंद त्यांच्या डायरीत आजही आढळून येते. त्यांचे सुपुत्र अॅड. महेश राणे यांनी त्यांच्या या सर्व नोंदी घरात जपून ठेवल्या आहेत. त्या काळात निवडणुकीसाठी केलेला बहुतेक खर्च उमेदवारासोबत प्रचारांदरम्यान फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चहापानावर केला जात असे. कार्यकर्त्यांची जेवणे एखाद्या कार्यकर्त्याच्या घरात होत असायची. त्यामुळे खर्चावर मर्यादा ठेवणे शक्य होते. पक्षाकडून एक वाहन तसेच पोस्टर पुरवले जायचे. प्रचार संपल्यानंतर कार्यकर्ते आपापल्या घरी निघून जात इतका साधा, सुटसुटीत प्रचार असायचा.
‘त्याकाळचे राजकारण बांदोडकर यांचे कार्य, नेतृत्व, त्यांच्यावर मतदारांचा असलेला विश्वास यावर होते. त्यामुळेच मतदान केले जात होते. आमदारसुद्धा पूर्ण राज्याच्या हितासाठी कार्य करणारे होते. आजच्या राजकारणात मात्र बराच फरक घडला आहे. जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच संधी देण्यावर पक्षाकडून भर दिला जातो’ असे महेश राणे म्हणाले.