लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा भेटीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या गोव्याच्या सहप्रभारी सुष्मिता देव यांनी 'भाजपच्या डबल इंजिन सरकारने गोव्यासाठी काय केले?' असा खरमरीत प्रश्न पंतप्रधानांना विचारला आहे. पणजी येथील पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी गोवा तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र काकोडकर आणि महिला विभागाच्या उपाध्यक्षा प्रतिभा बोरकर उपस्थित होत्या.
सुष्मिता देव यांनी गोव्यातील जनतेने दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आभार मानले.‘गेल्या साडेचार महिन्यांत 'टीएमसी'ला मोठा पाठिंबा मिळाला आहे. खाणकाम असो किंवा तीन रेषीय प्रकल्प असो, बेरोजगारी असो, मुरगाव पोर्ट ट्रस्टचे पोर्ट अथॉरिटीमध्ये रूपांतर झालेले असो, प्रत्येक मुद्द्यावर धोरणाबाबत तृणमूल काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली आहे.’
केंद्रातील तसेच राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधत सुष्मिता देव म्हणाल्या, ‘पंतप्रधान मीडियाला सामोरे जाणार नाहीत, परंतु 'टीएमसी'ला साध्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. तुमच्या डबल इंजिन सरकारने गोव्यासाठी काय केले आहे? तुमच्या दुहेरी इंजिन सरकारने ३ रेषीय प्रकल्प दिले आहेत जे गोव्यातील परिसंस्थेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. आज ६०८ कोटी रुपये अंदाजे खर्चून पणजी स्मार्ट शहरांपैकी एक होईल, असे सांगणाऱ्या या दुहेरी इंजिनच्या सरकारने सध्या १६ कोटी रुपये खर्च केले आणि तेही सौंदर्यीकरणासाठी.
आज मला या डबल इंजिन सरकारला विचारायचे आहे की, राज्यपाल पदावर असलेल्या एका व्यक्तीने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कारवाई का झाली नाही? लसीकरणाची बढाई मारणाऱ्या या डबल इंजिन सरकारला आम्ही विचारू इच्छितो की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ३ दिवसांत ८० लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांनी काय केले? या दुहेरी इंजिन सरकारने असे केले आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या दुप्पट दराची हमी दिली आहे.’’ काँग्रेस-भाजपच्या संगनमतावर निशाणा साधत राजेंद्र काकोडकर म्हणाले की, आमदारांचा पुरवठा आणि खरेदी, भ्रष्टाचार आणि जुमल्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून आहेत.