विठू सुकडकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मडगाव:तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरो हे फातोर्डा मतदारसंघातून २०२२ची विधानसभा निवडणूक लढविणार असल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. फालेरो यांना रिंगणात उतरविण्याच्या तृणमूल काँग्रेसच्या निर्णयामुळे फातोर्डा मतदारसंघात विजय सरदेसाई यांच्याविरुद्ध फालेरो आणि दामू नाईक अशी तिरंगी, अटीतटीची लढत होणार आहे. ख्रिस्ती मतदार कोणत्या बाजूने राहतात, हे पाहणे आता जास्त कुतूहलाचे ठरेल.
फालेरो हे नावेलीचे माजी आमदार असले, तरी फातोर्डा मतदारसंघात त्यांचे वास्तव्य आहे. तसेच ते अजून मास लिडर आहेत. नावेलीसह मडगाव व फातोर्डातील लोक त्यांच्या संपर्कात आहेत. फातोर्डाचा मतदारसंघ हा पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण, गेल्या दशकभरापासून हा मतदारसंघ गोवा फॉरवर्डकडे गेला आहे.
आजपर्यंत फातोर्डात गोवा फॉरवर्ड पक्षाचे वर्चस्व टिकून आहे. पण तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे लुईझिन फालेरो प्रथमच रिंगणात उतरतील. विजय सरदेसाई यांच्यासाठी हे आव्हान ठरेल. काँग्रेस-गोवा फॉरवर्डसाठी युतीसाठी ही नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.
फातोर्डात बहुसंख्य काँग्रेसचे मतदार आहेत. याआधी झालेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसतर्फे फातोर्डातून कमकुवत उमेदवार उभे केले गेले. यामुळे काँग्रेसचे पारंपरिक मतदार गोवा फॉरवर्डकडे वळले होते. आता लुईझिन फालेरो यांसारखे अनुभवी खासदार जर फातोर्डा मतदारसंघातून लढले तर मतदारसंघातील समीकरणे बदलतील. शिवाय काँग्रेस-फॉरवर्डची मते फुटतील, असे मानले जात आहे. ख्रिस्तीधर्मिय मतदारांची कसोटी लागणार आहे. २००२ व २००७ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांत तिरंगी लढत झाल्याने भाजपचे उमेदवार दामोदर नाईक निवडून आले होते.