पणजी : तृणमूल काँग्रेसने आणखी सहा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून म्हापशात तारक आरोलकर, साळगांवात भोलानाथ घाडी साखळकर, वास्कोत सैफुल्ला खान, केपेंत कांता गावडे, सांगेत राखी नायक व मुरगांवमध्ये जयेश शेटगांवकर यांना तिकीट दिले आहे. तारक आरोलकर यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम करुन तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. हळदोणे मतदारसंघात काँग्रेसने आपल्याला डावलून कार्लुस फेरेरा यांना तिकीट दिल्यामुळे ते नाराज होते.
आरोलकर हे म्हापसा पालिकेचे नगरसेवक असून ते ज्या प्रभागातून निवडून आले आहेत तो प्रभाग हळदोणे मतदारसंघात येतो. त्यामुळे ते हळदोण्यातून तिकीटासाठी इच्छुक होते. तृणमूलने त्यांना म्हापशात उमेदवारी दिली. साळगांवमधील भोलानाथ घाडी साखळकर भाजपचे कट्टर कार्यकर्ते होते परंतु ते आता भाजपसोबत नाहीत. अलीकडेच त्यांनी तृणमूलप्रवेश केला होता. वास्कोत सैफुल्ला खान हे बरीच वर्षे काँग्रेसमध्ये होते. तेदेखील अलीकडेच तृणमूलमध्ये आले होते.
कांता काशिनाथ गावडे हे लोककलाकार असून कलेच्या माध्यमातून त्यांचा लोकांशी संपर्क आहे. सांगेत राखी नायक यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचार चालवला होता. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करीत त्या तृणमूलमध्ये आलेल्या आहेत. तृणमूल आणि मगोपची युती असून या सर्व जागा दोन्ही पक्ष युतीनेच लढवणार आहेत त्यामुळे या जागांवर मगोपचे उमेदवार नसतील. दरम्यान, तृणमूलने अजून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावे, असे मगोप कार्यकर्त्यांना वाटते.