निवृत्ती शिरोडकर, लोकमत न्यूज नेटवर्क
पेडणे : संपूर्ण गोमंतकीयांचे दर निवडणुकीत लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ म्हणून पेडणे तालुक्यातील मांद्रे मतदारसंघाकडे पाहिले जाते. कारण या मतदारसंघाने दोन वेगवेगळ्या पक्षांचे मुख्यमंत्री राज्याला दिले. तसेच येथून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मंत्री झालेली व्यक्ती त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा निवडून आलेली नाही, असा या मतदारसंघाचा आजावरचा इतिहास आहे. हा इतिहास बदलण्यासाठी आता भाजपमध्ये ३२ वर्षांपासून कार्यरत असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे अपक्ष म्हणून यावेळी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे त्यांचा सामना एकेकाळी मित्र असलेल्या आमदार दयानंद सोपटे यांच्याशी होणार आहे.
माजी मुख्यमंत्री पार्सेकर आणि सोपटे या निमित्ताने तिसऱ्यांदा एकमेकांच्या विरोधात उभे असलेले दिसणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे मतदारांबरोबच राजकीय निरीक्षकांचेही लक्ष लागलेले असणार आहे. पार्सेकर (भाजप) आणि सोपटे (काँग्रेस) हे यापूर्वी २०१२ व २०१७ च्या निवडणुकीत आमने-सामने आले होते. २०१२ मध्ये पार्सेकर यांनी सोपटेंना, तर २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सोपटे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवत भाजप उमेदवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री पार्सेकर यांचा पराभव केला होता.
या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत. यावेळी एकेकाळी पार्सेकर यांचे समर्थक असलेले दीपक कळंगुटकर हेही गोवा फॉरवर्डकडून फॉरवर्ड-काँग्रेस युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात राहणार आहेत. तेही पार्सेकर आणि सोपटे यांच्या मतांची विभागणी करणार आहेत, तर दुसऱ्या बाजूने काँग्रेसला ही जागा न मिळाल्याने रमाकांत खलप, माजी मंत्री संगीता परब, युवा नेते सचिन परब नाराज झाले आहेत. ते युतीच्या उमेदवाराला काम करतील की पार्सेकर यांना मदत करतील हेही पाहण्यासारखे असणार आहे. ऐनवेळी कळंगुटकर यांचे समर्थक पार्सेकर यांच्या बाजूने तर जाणार नाहीत ना ? अशी शंका निर्माण होत आहे. कारण पार्सेकर आणि कळंगुटकर यांचे समर्थक हे एकमेकांचे समर्थक आहेत. त्यामुळे या सर्वांमध्ये सामन्या काऱ्यकर्ता आणि समर्थक यांचीही नेमकी कोणाची बाजू घ्यावी यावरुन कसोटी लागणार आहे.
बहुरंगी लढतीची अपेक्षा
मांद्रे मतदारसंघातून सध्यातरी आमदार दयानंद सोपटे यांनी पक्षाच्या समर्थकांना सोबत घेऊन कार्यरत आहेत. येथे मगोप विरुद्ध भाजप अशी सरळ लढत दिसत होती; परंतु आता माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्ष म्हणून रिंगणात असल्याने आमदार सोपटे, मगोपचे जीत आरोलकर, पार्सेकर, कळंगुटकर, आम आदमी पक्षाचे प्रसाद शहापूरकर, रिव्होल्युशनरी गोवन्सच्या सुनयना गावडे यांच्यात लढत अपेक्षित आहे.
इतिहास बदलणार की घडवणार?
मांद्रे मतदारसंघाचा इतिहास घडवण्यासाठी रिंगणात असणार असे माजी मुख्यमंत्री पार्सेकर सांगतात, तर आमदार सोपटे समर्थक इतिहास बदणार, असे सांगत आहेत. पार्सेकर यांनी केलेल्या बंडामुळे स्थानिक राजकारणही आता बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे पुढील काळात पार्सेकर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याबरोबरच समर्थकांमध्ये उत्सुकतावाढली आहे.