वासुदेव पागी, लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : ‘एखाद्या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी खर्च करण्याची कमाल मर्यादा निवडणूक आयोगाने काही लाखांची ठेवली असतो. परंतु प्रत्यक्ष हा खर्च लाखात नव्हे तर कोटीत मोजण्याचे हे दिवस आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीसाठी मला येणारा खर्च हा एखाद्या विधानसभा निवडणुकीसाठी जितका येतो, त्यापेक्षा कित्येक पटीने कमी येतो’ असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सांगतात. ‘विधानसभा निवडणुकीत होणारा खर्च प्रत्येक वर्षी वाढत जात आहे, ही चांगली गोष्ट नाही’ असेही नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले, ‘निवडणुकीत खर्च केलेला पैसा ही काही गुंतवणूक नसते. परंतु आज वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने कितीही निर्बंध घातले तरी खर्च करणारे विविध मार्ग शोधतात. त्या तुलनेत लोकसभा निवडणुकीसाठी मला खर्च कमी लागतो. माझा अनुभव सांगायचे झाल्यास उत्तर गोवा लोकसभेतील सर्व विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी प्रचार करण्यासाठीही मला फार कमी खर्च येतो. विधानसभेच्या निवडणुकीत एका मतदारसंघात खर्च केला जातो, त्यापेक्षा कित्येक पटीने कमी पैसे मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी खर्च केले आहेत.’