Goa Election 2022: उत्पल पर्रिकर इन अॅक्शन! काँग्रेसच्या उदय मडकईकरना भेटले; पणजीत पाठिंबा देण्याची केली विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 04:35 PM2022-01-22T16:35:10+5:302022-01-22T16:36:13+5:30
Goa Election 2022: काँग्रेसने उदय मडकईकर यांना डावलून पणजीत एल्विस गोम्स यांना उमेदवारी दिली आहे.
पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) भाजपने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची घोषणा केलेले उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांनी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांची भेट घेऊन आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली.
काँग्रेसने उदय मडकईकर यांना डावलून एल्विस गोम्स यांना उमेदवारी दिली आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची उदय यांची तयारी नाही. एक तर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणे किंवा उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा देणे हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर आहेत.
भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याबाबत उत्पल ठाम आहेत. ते वेगवेगळ्या घटकांकडून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शनिवारी दुपारी त्यांनी उदय मडकईकर यांची घेतलेली भेट याच रणनीतीचा भाग होता.
दरम्यान, उदय यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्हा दोघांची सकारात्मक बोलणी झालेली आहे. परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नंतरच योग्य तो निर्णय घेणार आहे. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत मी माझा निर्णय जाहीर करीन.