पणजी – गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी भाजपाला अखेर रामराम केला आहे. शुक्रवारी उत्पल पर्रिकर यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आता आगामी काळात पणजी विधानसभा मतदारसंघातून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पर्रिकर कुटुंबातील सदस्याने भाजपा सोडल्याने त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्पल पर्रिकर यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तर काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले होते. मात्र नंतर मोन्सेरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता भाजपाने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारत मोन्सेरात यांनाच उमेदवारी जाहीर केली. तसेच उत्पल पर्रिकर यांच्यासमोर पणजीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्याचा पर्याय पक्षनेतृत्वाने दिला होता. मात्र उत्पल पर्रिकर पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यामुळे पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली.
भाजपानं दिली होती ऑफर
माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर हे संघटक प्रेमी होते. पर्रिकर कुटुंबीय भाजपचाच एक भाग आहेत. भाजप त्यांना आपलेच कुटुंब मानतो. मात्र, उत्पल पर्रिकर यांना आताच्या घडीला पणजीतून उमेदवारी मिळणे शक्य नाही. उत्पल पर्रिकर यांना डिचोलीतून तसेच भाजपच्या पारंपरिक मतदारसंघातून उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आली होती. पर्रिकरांना पाच वर्षांनंतर पुन्हा पणजीत आणू अशी ऑफर भाजपाचे गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
उत्पल पर्रिकरांची निवडणूक तयारी सुरु
उत्पल पर्रिकर आणि त्यांच्या समर्थकांनी पणजीतून प्रचारास सुरुवात केली आहे. उत्पल स्वतः घरोघरी जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. मनोहर पर्रिकर यांचे जुने सहकारीही उत्पल यांच्यासोबत आहेत. त्यांचेही मत आहे की, उत्पल पर्रिकर हे पणजीतून निवडणूक लढवण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांना पणजीतूनच उमेदवारी देण्यात यावी, यावर तेही ठाम होते. तत्पूर्वी, भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पणजीतून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली.