पणजी / म्हापसा : विधानसभेची निवडणूक मी लढवणार आहे. मात्र, कोणत्या पक्षाच्या उमेदवारीवर ते पुढील दोन दिवसात आपण ठरवणार असल्याचे आमदार विनोद पालयेकर यांनी सांगितले. तृणमूल प्रवेशाबाबत भाष्य करणे पालयेकर यांनी टाळले.
कुठल्याही स्थितीत मी ही निवडणूक लढवणार आहे. शिवोली मतदार संघात आपली बरीच वैयक्तिक मते आहेत. या मतांच्या जोरावर मी निवडून आलो. फक्त सोबत गोवा फॉरवर्ड पक्षाची निशाणी होती. गेल्या २० वर्षांपासून आपण राजकारणात आहोत. अनेक विकासकामे मतदारसंघात केली आहेत. त्यांच्या जोरावर आपण रिंगणात उतरणार. आपले प्रामाणिक कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याचे पालयेकर म्हणाले. रिंगणात कितीही उमेदवार उतरले तरी त्या उमेदवारांना आपल्या शुभेच्छा आहेत असे ते म्हणाले.
पालयेकर हे गोवा फॉरवर्डच्या तिकिटावर शिवोलीतून निवडून आले होते. मात्र, काँग्रेस व गोवा फॉरवर्डची युती झाली असली तरी हा मतदारसंघ गोवा फॉरवर्डला सोडलेला नसल्याने पालयेकर सद्या नाराज आहेत. कॉंग्रेसतर्फे या मतदारसंघात डिलायला लोबो निवडणूक लढवणार आहेत.