यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क
फोंडा : शिरोडा मतदारसंघामध्ये एकूण २९,००० मतदार आहेत. त्यातील साडेपाच ते सहा हजार ख्रिस्ती समाजातील मतदार आहेत तर दीड ते दोन हजार मुस्लिम मतदार आहेत. मतदारसंघात यंदा महादेव नाईक आणि सुभाष शिरोडकर हे दोन मातब्बर नेते रिंगणात आहेत तर ५ नवे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
मात्र, यंदा मतदारसंघातील अल्पसंख्यांक विशेषकरून ख्रिस्ती समाज निवडणुकीबाबत बराच गोंधळलेला दिसतो. शिरोड्यातील ख्रिस्ती समाजबांधवांचे मतदार येथे मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच मुस्लि मतदारही आहेत. आतापर्यंतच्या प्रचारात सुभाष शिरोडकर हे आघाडीवर आहेत. मतदारसंघात हिंदू मतदारांची संख्या जास्त आहे. त्यापाठोपाठ संख्या ख्रिस्ती समाजाची आहे. पंचवाडी येथेही ख्रिस्ती समाज मोठ्या प्रमाणावर आहे.
यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात यंदा भाजपचे सुभाष शिरोडकर, आरचे महादेव नाईक यांच्यासह सुभाष प्रभूदेसाई, शैलेश नाईक, तुकाराम बोरकर, संकेत मुळे, स्मॉलो ग्रेसियस हे उमेदवार आहेत. त्यात स्माॅलो हा एकच ख्रिस्ती समाजाचा उमेदवार आहे. मतदारसंघातील ख्रिस्ती समाज हा पंचवाडी, शिरोडा, बेतोडा या भागामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो तर मुस्लिम मतदार बेतोडा, दत्तगड, शिरोडा, बोरी व इतर भागांमध्ये पाहायला मिळतात. दत्तगड येथे मुस्लिम मतदार आहेत. तर काही ख्रिस्तीही मतदार आहेत. शिरोड येथील ख्रिस्ती समाजबांधव ग्रेसीयस यांच्या खात्यात मते टाकू शकतात. आरजीचे शैलेश गावकर हे राजकारणात नवखे आहेत. मात्र अल्पसंख्याकाची मते विभागून जाण्याची दाट शक्यता आहे.
निवडणूक... पोटनिवडणूक
२०१७च्या निवडणुकीत सुभाष शिरोडकर हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. त्यांना ११,१५६ तर भाजपचे उमेदवार महादेव नाईक यांना ६,२८३ मते मिळाली होती. अभय प्रभू यांना ५८१५ मते मिळाली होती. निलेश गावकर यांना ४४७ तर दिया शेटकर १४० मते मिळाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारसंघांमधील ख्रिस्ती व मुस्लिम समाजातील मतदारांनी दीपक ढवळीकर यांना पाठिंबा दिला तर हिंदू समाजातील बहुतांश मतदारांनी सुभाष शिरोडकर यांना मतदानाने निवडून आलेले.