पणजी: पणजी विधानसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर जर उत्पल पर्रीकर यांनी भाजप मध्ये जाणार नसल्याची हमी दिली तरच त्यांना पाठिंबा देण्याचा विचार केला जावू शकतो असे महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सध्या तरी शिवसेनेचे पणजीचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर हे उमेदवारी अर्ज भरतील. उत्पल यांना पाठिंबा देण्याबाबत तेव्हाची परिस्थिती पाहून शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत हे पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याची चर्चा करुन निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
सामंत म्हणाले, की गोवा विधानसभा निवडणूकीत शिवसेना दहा जागा लढवणार आहे. त्यानुसार उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रचार सुध्दा केला जात आहे. निवडणूकीसाठी शिवसेने ने राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत युती केली असून जागा वाटपांवरही निर्णय झाला आहे. शिवसेनेकडून गोव्याच्या राजकारणात तरुणांची एक सक्षम पिढी तयार करण्यावर भर दिला जात आहे.
भाजपला वाटते गोव्यात त्यांची मक्तेदारी आहे. भाजपकडून नेते व कार्यकर्त्यांचा केवळ वापर केला जात आहे. मनोहर पर्रीकर सारख्या ज्या नेत्याने पक्ष वाढवला त्याच नेत्याच्या मुलाला उत्पल याला भाजपने निवडणूकीची तिकिट नाकारली. हे पूर्णपणे अयोग्य आहे. गोव्यात आज परिवर्तनाची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत, गोवा जीवन कामत, बाबूराव भोईर आदी पक्षाचे नेते हजर होते.
आणखीन दोन उमेदवार जाहीरशिवसेनेकडून आणखीन दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यानुसार मांद्रेतून बाबली नाईक तर शिवोलीतून चरिष्मा फर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना १० जागांवर निवडणूक लढवणार असून यापूर्वी आठ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.