पणजी: गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसला गोव्यात सरकार स्थापन करता आलं नव्हतं. भारतीय जनता पक्षानं छोट्या पक्षांची मदत घेत सत्ता मिळवली. त्यावेळी मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. किंबहुना पर्रिकरांना मुख्यमंत्री करा, तर पाठिंबा देतो, अशी अटच लहान पक्षांनी घातली होती. आता गोव्यात पुढील वर्षी निवडणूक होत आहे. पर्रिकरांच्या निधनानंतर होत असलेल्या या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भाजप जबरदस्त कामगिरी करण्याची शक्यता आहे. एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणातून तशी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला गोव्यात केवळ १३ जागा मिळाल्या आहेत. एकूण ४० जागा असलेल्या विधानसभेत बहुमतापासून भाजप बराच दूर होता. या निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक १७ जागा जिंकल्या होत्या. मात्र लहान पक्षांच्या मदतीनं भाजपनं सरकार स्थापन केलं. एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, राज्यातील भाजपचं सरकार कायम राहण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी होत असलेल्या निवडणुकीत भाजप तब्बल २७ जागा जिंकेल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. भाजपच्या जागा दुप्पट होत असताना काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसत आहे. काँग्रेसच्या जागा १७ वरून थेट ४ वर येण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष या निवडणुकीत ५ जागा जिंकेल असा अंदाज आहे. तर इतरांना ६ जागा मिळू शकतात.
गेल्या निवडणुकीत भाजपला ३२.५ टक्के मतं मिळाली होती. ती आता ३७.५ टक्क्यांवर जाताना दिसत आहेत. काँग्रेसच्या मतांमध्ये घसरण होईल असा अंदाज आहे. २०१७ मध्ये काँग्रेसला २८.४ टक्के मतं मिळाली होती. ती आता १८.३ टक्क्यांवर येतील असं सर्वेक्षण सांगतं. मागील निवडणुकीत ६.३ टक्के मतं मिळवलेल्या आपच्या मतांमध्ये घसघशीत वाढ होऊ शकते. त्यांना यंदा २२.८ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे.