Amit Palekar, AAP CM Candidate: गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा काही दिवसांपूर्वी जाहीर झाल्या. तेव्हापासून गोव्याच्या राजकारणाला जोर आला आहे. निवडणुक प्रचारासह आरोप-प्रत्यारोपांची मालिका पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसंदर्भात आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वाची घोषणा केली. अमित पालेकर हे गोव्यात 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे केजरीवाल यांनी जाहीर केले. केजरीवाल यांनी आज गोव्याची राजधानी पणजी येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आप गोव्यातील ६० पैकी ४० जागांवर निवडणूक लढवणार आहे.
कोण आहेत अमित पालेकर?
गोव्यात आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असलेले अमित पालेकर हे वकील आणि समाजसेवक आहेत. अमित पालेकर हे ओबीसी भंडारी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. गोव्यात सुमारे ३५ टक्के लोकसंख्या ही ओबीसी भंडारी समाजाची आहे. अमित पालेकर यांनी ऑक्टोबरमध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला. भाजपच्या नेत्या शायना एनसी यांचा गोव्यातील बंगला बेकायदेशीर असल्याचा आरोप करत अमित पालेकर यांनी त्या विरोधात उपोषण केलं होतं. त्यावेळी तो चांगलेच चर्चेत आले होते.