पणजी : काँग्रेसने पर्येत याआधीच प्रतापसिंग राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे. ते निवडणूक लढवणार नसतील तर त्यांनी पर्यायी उमेदवार द्यावा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत चिदंबरम् एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, ‘पर्येतील उमेदवार एक- दोन दिवसात स्पष्ट होईल.’ काँग्रेसने ज्येष्ठ राणे यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी ते निवडणूक लढवणार आहेत की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. भाजपने पर्येत त्यांची सून दिव्या राणे यांना तिकीट दिले आहे.
काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यासंदर्भात चर्चा होईल. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडणुकीआधी जाहीर करावा की निकालानंतर निवड करावी, हे ठरणार आहे. याबाबतीत काँग्रेस योग्य तोच निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
‘तृणमूलने आमचे नेते पळविले’तृणमूलकडून येत्या निवडणुकीसाठी युतीचा प्रस्ताव होता. परंतु, एकीकडे पक्षाने हा प्रस्ताव दिल्यानंतर दुसरीकडे कुडतरी, वास्को, मुरगावमध्ये तृणमूलने काँग्रेसचे नेते पळवले. हे योग्य नव्हे, असे चिदंबरम एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले.