मडगाव - दारूच्या सेवनावर कुठलेही निर्बंध नसलेल्या गोव्यात प्रतिदिन सरासरी किमान दोन वाहन चालकांचे परवाने दारू किंवा अंमली पदार्थाच्या अंमलाखाली वाहन चालवल्याच्या कारणावरुन निलंबित केले जात आहेत. जानेवारी 1 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत तब्बल 876 वाहन चालकांचे परवाने याच कारणांमुळे निलंबित केल्याची माहिती वाहतूक खात्याच्या आकडेवारीवरुन प्राप्त झाली आहे. मागील वर्षात वाहतूक नियमांची भंग केल्याची 7355 प्रकरणे नोंद झाली असून जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सर्वात जास्त म्हणजे 2,303 प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी 876 वाहन चालकांचे परवाने निलंबित केले गेले आहेत. 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत 206, 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत 53, 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत 215 तर 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीत 402 वाहन चालकांचे परवाने निलंबित केले गेले आहेत.
दारू किंवा इतर अंमली पदार्थांच्या सेवन करुन गाडी चालवल्यास वाहन चालकाच्या नकळत गाडीचा वेग वाढून अपघात होऊ शकतो. 1 पेग दारू घेतली तरीही हा अंमल येऊ शकतो. अशा परिस्थितीत अपघात होऊ नयेत यासाठीच ही कारवाई केली जात असून जर कुठल्याही वाहन चालकाला आपला परवाना निलंबित करुन घ्यायचा नसेल तर त्यांनी दारू प्यायलेल्या अवस्थेत वाहन चालविणे टाळावे, असा सल्ला पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी दिला.
दारुच्या अंमलाखाली वाहन चालवल्याचे सिद्ध झाल्यास त्या वाहन चालकाला सहा महिन्यापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो. जर दुस-यांदा अशा प्रकारचा गुन्हा केल्यास दोन वर्षापर्यंत कैद आणि तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा त्या वाहन चालकाला होऊ शकते.
5834 सेन्टिनल्सगोव्यात ट्रॅफिक सेन्टिनल्स या योजनेला काही नागरिकांकडून आणि राजकारण्यांकडून विरोध होत असला आणि काही ठिकाणी या सेन्टिनल्सना मारहाण करण्याच्याही घटना घडल्या असल्या तरी दिवसेंदिवस सेन्टिनल्सची संख्या वाढतच असल्याचे निदर्शनास आले आहे. गोवा वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या सेन्टिनल्स अॅपवर आतापर्यंत 5834 जणांनी आपली नोंदणी करुन घेतली आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे.