पणजी - माजी उद्योग मंत्री महादेव नाईक यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकला आहे. ते रविवारी काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश करणार आहेत.
नाईक यांच्या घरी जाऊन शुक्रवारी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली व काँग्रेसमध्ये प्रवेश करावा अशी विनंती केली. आपण त्यानुसार रविवारी प्रवेश करणो निश्चित केले आहे. तत्पूर्वी लगेच आपण भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहे, असे नाईक यांनी लोकमतला सांगितले. नाईक यांचा 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. तत्पूर्वी ते दोनवेळा शिरोडय़ात सुभाष शिरोडकर यांचा पराभव करून निवडून आले. नाईक दोनवेळा जिंकले तेव्हा त्यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. यापुढे पोटनिवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्ष तिकीट देण्याची शक्यता आहे. 90 च्या दशकात नाईक हे काँग्रेसचे सदस्य होते. आता त्यांची काँग्रेस पक्षात घरवापसी होईल.
आपण पक्षात प्रवेश केल्यानंतर मग तिकीट कुणाला द्यायचे ते पक्ष ठरवेल. अजून काही ठरलेले नाही, असे नाईक यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, की शिरोडा मतदारसंघात जे सुभाष शिरोडकर यांच्याविरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्या सर्वानी अगोदर काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असा आमचा प्रस्ताव आहे. मगो पक्षाचे उमेदवार वगळता आम्ही अन्य सर्व इच्छुकांना प्रस्ताव दिला आहे. आम्ही प्रत्येकाला जाऊन भेटत आहोत. तुकाराम बोरकर व डॉ. सुभाष प्रभुदेसाई यांनाही मी भेटणार आहे. अगोदर काँग्रेसमध्ये या, काँग्रेसचे सदस्य व्हा आणि मग एकत्र बसून तिकीट कुणाला ते ठरवूया. एकदा तिकीट निश्चित झाल्यानंतर सर्वानी मिळून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारासाठी काम करावे असे आम्हाला अपेक्षित आहे.