पणजी: राज्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेती, बागायतीचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांना सरकार नुकसानभरपाई देईल असे कृषी मंत्री रवी नाईक यांनी सांगितले.
पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी संचालकांना दिले आहेत. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतरच नक्की किती नुकसान झाले हे समजेल. त्यावर आताच बोलणे कठिण आहे, कारण अजूनही पावसाचा जोर कमी झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री नाईक म्हणाले, की शेतकरी हे कष्टकरी तसेच गरीब लोक आहेत. त्यामुळे पावसामुळे त्यांच्या शेती, बागायतीचे नुकसान झाल्याने त्यांना सरकार नक्कीच नुकसानभरपाई देणार. राज्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. याबाबतचा अहवाल आपण कृषी खात्याकडे मागवला आहे. शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, कोणत्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले याचा तपशील खाते सादर करेल असे त्यांनी सांगितले.