समीर नाईक, गोवा पणजी: अग्नीशामक दलाच्या कार्याचा आढावा घेतल्यास समजून येते की त्यांचे कार्य खूप मोठे आहे. याच कार्यशमतेच्या आधारावार अग्नीशामक दलाला आयएसओ आणि ऑक्यूपेशनल हेल्थ मानांकित प्रशस्तीपत्रक प्राप्त झाले आहे. देशातील थोडक्याच विभागाला अशी आयएसओचे प्रशस्तिपत्रक मिळाले आहे, आणि आमच्या राज्यातील अग्नीशामक दल त्यापैकी एक आहे, ही गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
सांतईनेझ, पणजी येथे अग्नीशामक दलातर्फे शुक्रवारी राष्ट्रीय अग्निशामक सेवा दिवस कार्यक्रम पार पडला. या दरम्यान प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी त्यांज्यासोबत अग्नीशामक दलाचे संचालक नितीन रायकर, सचिव रमेश वर्मा, गोवा पाेलिस खात्याचे महासंचालक जसपाल सिंग, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ज्या प्रकारे अग्नीशामक दलातर्फे आपल्या विभागासाठी आयएसओ प्रशस्तीपत्रक मिळवले, त्याचप्रकारे इतर विभागाने देखील आयएसओ प्रशस्तीपत्रक प्राप्त करावे, जेणेकरुन कामामध्ये शिस्त येईल, तसेच कामही चांगल्या प्रकारे होईल. अग्नीशामक दल हा गृह खात्याशी जोडलेला आहे, तसेच राज्यातील अग्नीशामक दलाला विभागीय प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे, त्यामुळे इतर राज्यातील दलाचे जवान येथे येऊन प्रशिक्षण घेतात, हेही तेवढेच महत्वाचे आहे, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
दलाचे काम पाहता, आवश्यकतेनुसार नविन भरती देखील करण्यात येणार आहे. सध्या आपदा मित्र आणि आपदा सखी यांना भविष्यात दलाच्या जवानांना मदत करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात येत आहे. तसेच पायाभूत सुविधा आम्ही प्रदान करत आहोत, अग्निशामक दलाची नविन मुख्यालय देखील आधुनिक साधनसुविधेसह उभे होत आहे. यापूढे देखील नविन गोष्टींसाठी अग्नीशामक दलाला सरकारचा पूर्ण पाठिंबा असणार आहे, असेही डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यानी हुतात्म जवानांना श्रध्दांजली वाहीली. नंतर परेडकरुन मानवंदना स्विकारली. दरम्यान अग्नीशामक दलातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना आणि जवानांना प्राप्त झालेल्या प्रशस्तीपत्रकांचे वितरण करण्यात आले. अधिकारी अजित कामत यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
७ जणांना जीवनदान, १६९.५३ कोटींची मालमत्ता वाचविण्यात यश: दलाचे संचालक नितीन रायकर
गेल्या वर्ष भरात अग्नीशामक दलाला सुमारे ७२१३ कॉल्स आले आहेत. या कॉल्सच्या आढारे अग्नीशामक दलाने ७ जणांना जीवनदान दिले आहे, आणि १६९.५३ कोटींची मालमत्ता वाचविण्यास देखील त्यांना यश आले आहे. तर ८१ कोटींचे नुकसानही झाले आहे. सात हजारपैकी ९ खोटे कॉल्सही होते. पण गोमंतकीयांनी खोटे कॉल्स करु नये, यातून अनेकदा इतर महत्वाच्या गोष्टीत विलंब होऊ शकतो, असे संचालक नितीन रायकर यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"