मडगाव: यंदा प्रथमच कुत्र्याने चावा घेतल्याने रेबिज होऊन मृत्युमुखी पडण्याच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाही. त्यामुळे गोवा हे देशातील पहिलेच रेबिजमुक्त राज्य होण्याच्या वाटेवर वाटचाल करत आहे. मागची पाच वर्षे मिशन रेबिज या मोहिमेखाली एक दशलक्षपेक्षा अधिक श्वानांचे लसीकरण आणि त्याचबरोबर केलेली जागृती त्यामुळेच ही किमया साध्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.2011 पासून 2017 पर्यंत गोव्यात कमी प्रमाणात का होईना पण रेबिज बाधा होऊन लोकांना मृत्यू आला होता.मात्र यंदा 30 नोव्हेंबरपर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. यासंबंधात मत व्यक्त करताना मिशन रेबिजचे शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मुरुगन अप्पूपिल्लई यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, लहान मुलांवर आम्ही लक्ष केंद्रित केल्यामुळे आम्हाला हे यश मिळाले असे ते म्हणाले. रेबिज रोगासंदर्भात या योजनेखाली शाळांतून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मिशन रेबिजकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार 2011 साली गोव्यात पाच जणांना रेबिजमुळे मृत्यू आला होता. 2012 साली हा आकडा 13 वर पोहोचला होता. 2013 साली तो खाली उतरून पाचवर आला. मात्र 2014 साली हा आकडा 15 वर पोहोचला होता. 2015 साली पाच, 2016 साली एक, तर 2017 साली दोन मृत्यूंची नोंद झाली.मिशन रेबिज ही योजना 2013 साली गोव्यातूनच सुरू झाली होती. या मोहिमेखाली लोकांमध्ये जागृती करण्याबरोबरच कुत्र्यांचे लसीकरण व निर्बिजीकरण हे उपाय हाती घेतले होते. येत्या तीन वर्षांत गोव्यातील 50 टक्के कुत्र्यांचे लसीकरण करण्यास आम्ही यशस्वी ठरू, असे पशुचिकित्सा खात्याचे सहाय्यक संचालक डॉ. विलास नाईक यांनी सांगितले. डॉ. नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गोव्यात भटके आणि पाळीव अशा प्रकारचे सुमारे एक लाख कुत्री असून मिशन रेबिज ही मोहीम गोव्यातून सुरू झाली. या मोहिमेला मिळत असलेले यश पाहून हाच मॉडेल आता इतर राज्यातही वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुत्र्यांनी चावे घेतल्यामुळे जगात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये एक तृतीयांश लोक भारतीय असल्याचे डॉ. अप्पुपिल्लई यांनी सांगितले. गोव्यात एकूण 1390 शाळांमध्ये रेबिज संदर्भात माहिती देणाऱ्या या मोहिमेखाली कार्यशाळा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.
गोवा देशातील पहिलेच रेबिजमुक्त राज्य होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 3:24 PM