पणजी : भाजपाचे नेते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि विद्यमान ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा या दोघांनीही जाहीरपणे टीकेचा सूर लावल्यानंतर गोवा भाजपामध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर याच आठवड्यात पक्षाच्या कोअर टीमची बैठक बोलवावी, असे ठरवण्यात आले आहे. नोकर भरती रद्द करण्याच्या विषयावरून माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर नुकतीच जोरदार टीका केली. आपल्या सरकारच्या काळात जी नोकर भरती सुरू करण्यात आली होती, ती आता विद्यमान पर्रीकर सरकार रद्द करतेय, असा पार्सेकर यांचा समज झाला आणि पार्सेकर यांनी सरकारवर जाहीरपणे प्रथमच हल्ला चढवला. यामुळे भाजपामध्ये खळबळ उडाली आहे.
जे गेल्यावर्षी मुख्यमंत्रीपदी होते, अशा ज्येष्ठ नेत्याने केलेला हल्ला हा गोव्यातील भाजपासाठी प्रथमच अनुभव होता. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे स्वत: यामुळे अस्वस्थ झाले. भाजपाच्या कोअर टीमचे पदाधिकारी दत्ता खोलकर याना पर्रीकर यांनी पार्सेकर यांच्याशी बोलण्यास सांगितले व त्यानुसार खोलकर हे पार्सेकर यांच्याशी बोलले पण त्यांची नाराजी खोलकर दूर करू शकलेले नाहीत.
अल्पसंख्यांक समाजाचे एक नेते असलेले फ्रान्सिस डिसोझा हे पर्रीकर सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांना असलेले पोलिसांचे एस्कॉर्ट सरकारने नुकतेच मागे घेतले. एस्कॉर्ट काढून घेण्याविषयी डिसोझा यांनी नाराजी व्यक्त केली नाही. आपल्याला एस्कॉर्ट नको, असे काही महिन्यांपूर्वी डिसोझा यांनीच सरकारला सांगितले होते पण ते काढून घेण्याचे जे टायमिंग सरकारने साधले, त्यामुळे डिसोझा यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
अशात डिसोझा यांनी काही वेगळ्याच विषयांवरून टीकेचा सूर लावल्यामुळे भाजपामधील अस्वस्थतेत भर पडली आहे. आपला धर्म काहीजणांना खटकतोय, असेही विधान डिसोझा यांनी केले. तसेच अनेक आमदारांना आरोग्याच्या समस्या असतात पण आपल्याच आरोग्याच्या विषयावरुन इशू केला जातो, अशा शब्दांत डिसोझा यांनी भाजपामधील काहीजणांवर निशाणा साधला. डिसोझा हे गेले दीड महिना परदेशात होते. अशावेळी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी काही अधिकारी व भाजपा कार्यकर्त्यांना घेऊन डिसोझा यांच्या मतदारसंघात विकास कामे मार्गी लावण्यासाठी दोन बैठका घेतल्या.
भाजपाची कोअर टीम सध्या हे सगळे पाहत आहे. पूर्वी कोअर टीमच्या सातत्याने बैठका व्हायच्या व नाराजी निर्माण होणाऱ्या विषयांबाबत साधकबाधक चर्चा होत असे. अलिकडे बैठकच झाली नाही. कधी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक तर कधी मुख्यमंत्री पर्रीकर यांची वेळ निश्चित होत नाही व त्यामुळे बैठकीची तारीख ठरत नाही पण पक्षातील व सरकारमधील सध्याची स्थिती लक्षात घेऊन याच आठवड्यात कोअर टीमची बैठक घेतली जाईल. त्या बैठकीला पार्सेकर व डिसोझा हे दोन्ही नेते उपस्थित राहतील, असे कोअर टीमच्या एका सदस्याने 'लोकमत'ला सांगितले.