पणजी : पर्रीकर सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष झाल्यानंतर आता सरकारमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांचे भाजपच्या काही माजी मंत्री व पदाधिका-यांशी मोठे खटके उडू लागले आहेत. भाजपा व गोवा फॉरवर्ड यांच्यातील संबंधांना तडे गेल्याचे संकेत मिळत असतानाच मंत्री जयेश साळगावकर यांनी शुक्रवारी माजी मंत्री दिलीप परुळेकर व साळगावच्या भाजपा पदाधिका-यांवर जोरदार हल्लाबोल केला. साळगावमधील विकास कामांविषयी परुळेकर की मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यापैकी कोण खोटे बोलतात ते मला सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.मंत्री साळगावकर हे कधीच आक्रमक होत नाहीत पण परुळेकर यांची पत्नी मेधा परुळेकर तसेच साळगाव भाजपाचे पदाधिकारी जयेश सामंत व इतरांनी सोशल मीडियावरून केलेल्या आरोपांनंतर साळगावकर व्यथित झाल्याचे दिसून आले. दोन महिन्यांपूर्वी नेरुलमध्ये झालेल्या एका बलात्कार प्रकरणाशी अकारण आपल्या मेहुण्याचे नाव परुळेकर व सामंत याने जोडले व ते प्रकरण आपण दाबून टाकले, असाही आरोप केला. आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याने आपण मेधा परुळेकर व सामंत यांच्याविरुद्ध लेखी पोलीस तक्रार दिली आहे.या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. पोलिसांनी मेधा व सामंत याचा फोन ट्रेस होत नाही अशी माहिती आपल्याला दिल्याचे मंत्री साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बलात्कार प्रकरणी शोषित मुलीने पोलिसांना जी जबानी दिली होती, त्याबाबतची माहिती आपण आरटीआयखाली मागणार आहे. त्या जबानीत कुणाचा नामोल्लेख झाला आहे काय ते कळून येईल असे साळगावकर म्हणाले.तर लोकायुक्तांकडे जाऊ राजकारणातील काही व्यक्ती कोणत्या थराला पोहोचू शकतात ते आपल्याला बलात्कार प्रकरणाच्या पोस्ट वाचून कळून आले. विद्यमान सरकारला आम्ही पाठिंबा दिला म्हणून दिलीप परुळेकर आज तोंड वर करून काही तरी बोलू शकतात. परुळेकर यांनी गिरी, नेरूल वगैरे भागात जी कामे ओव्हर इस्टिमेट करून दाखवली आहेत, त्या कामांची चौकशी आम्ही सुरू केली आहे.आम्ही सध्या जलसंसाधन खात्याच्या फाईल्स तपासत आहोत. जी कामे सात-आठ लाख रुपयांमध्ये होतात ती कामे परुळेकर हे चौदा लाखांना केल्याचे सांगतात. ती कामे झालेलीच नाहीत. यापुढे प्रसंगी परुळेकरांविरुद्ध लोकायुक्तांकडेही आपण जाणार आहे, असा इशारा मंत्री साळगावकर यांनी दिला.मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्याला सोळा कोटींचा निधी साळगावमध्ये विकासकामे करण्यासाठी दिला होता. त्यापैकी साडेपंधरा कोटी रुपये आम्ही खर्च केले. म्हणजेच आम्ही विकास केला आहे. मात्र विकास झालाच नाही असे म्हणणारे परुळेकर खोटे बोलतात की आम्हाला सोळा कोटींचा निधी देऊन आमच्याकडून कामे करून घेणारे पर्रीकर खोटे आहेत ते सिद्ध व्हावे, असेही आव्हान मंत्री साळगावकर यांनी दिले.
गोवा फॉरवर्ड-भाजप संबंधांना तडे, मंत्री साळगावकरांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 7:54 PM