मडगाव: विदेशातील गोवेकरांना गोव्यात आणण्यासाठी देशातील 10 राज्यातील विमानतळ उघडे झाले पण त्यात दाबोळी विमानतळाचा समावेश नसल्याबद्दल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आश्चर्या व्यक्त केले असून या सरकारच्या शब्दाला दिल्लीत किमंत नाही हे पुन्हा सिद्ध झाले आहे अशी टीका केली आहे.
हे सरकार आतापर्यंत मुके आणि बहिरे असे आम्हाला वाटत होते पण ते नाकर्ते असल्याचेही आता सिद्ध झाले आहे. आम्ही प्रधानमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहोत असे रोज सांगणाऱ्या गोवा सरकारला केंद्रात त्यांचेच सरकार असतानाही साधा दाबोळी विमानतळ खलाशाना घेऊन येणाऱ्या चार्टर विमानांना उघडता आला नाही, ही शरमेची बाब असल्याचे ते म्हणाले. आता गोवा फॉरवर्ड पक्ष गोवेकरासाठी दाबोळी विमानतळ खुला करावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असलेल्या प्रधानमंत्र्यांना राज्यपाला मार्फत निवेदन पाठवू असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि युरोप या देशासह जगभर अडकून पडलेल्या भारतीयांना पुन्हा देशात आणण्यासाठी भारतातून 64 विमाने 7 मे पासून पाठविली जाणार असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. ही 64 विमाने भारतातील 10 राज्यातून वाहतूक करणार आहेत. गोव्यातील हजारो नागरिक आणि खलाशी देशाबाहेर अडकलेले असतानाही गोव्याचा या 10 राज्यांमध्ये समावेश नाही.
देशाबाहेर अडकलेले हे हजारो गोमंतकीय आणि खलाशी मागचे दोन महिने गोवा व केंद्र सरकारकडे वारंवार आपल्याला या अवस्थेतून सोडवावे अशी मागणी करत आहेत. या खलाशी आणि इतरांच्या कुटुंबियांच्या वतीने गोवन सिफेरर अससोसिएशन ऑफ इंडिया, इतर संघटना, राजकारणी आणि गोवा फॉरवर्डसह अनेक राजकीय पक्षांनी सरकारला असंख्य निवेदनेही दिली. मात्र याबाबतीत ज्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता ते गोवा सरकार कित्येक आठवडे मुके आणि बहिऱ्या प्रमाणेच वागले असं विजय सरदेसाई यांनी सांगितले.
खलाशांच्या कुटुंबियांकडून आणि लोकांकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्यानंतर आलेल्या दबावाखाली राज्य सरकारने केवळ मुबंईत पोहोचलेल्या मारेला जहाजावरील खलाशाना खाली उतरविण्याचे केवळ सोपस्कार केले. पण तसे करतानाही क्वारान्टीन सुविधा , त्याचे शुल्क आदींबाबत निर्णय घ्यायला सरकारला तब्बल एक आठवडा लागला.
कर्णिका आणि आंगरिया या जहाजावरील खलाशाबाबत न बोललेलेच बरे, कारण या जहाजावर असलेले युक्रेन आणि अन्य देशाचे खलाशी गोव्यातून आपल्या राज्यात पोहोचलेले असताना खलाशांच्या कंपन्याना जास्तीत जास्त लुटू पाहणारे एजंट आणि गोव्यातील सरकारी नोकरशाही यांची टेबलखालील डिल्स अजून पूर्ण न झाल्याने ते अडकून पडले असून ते गोव्यात पोहोचत नाहीत अशी टीका त्यांनी केली.
एवढे दिवस गोवेकरांना मात्र हा केंद्राच्या अखत्यारीत असलेला प्रश्न असून आम्ही प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाच्या संपर्कात आहोत अशा सुक्या घोषणा आणि आस्वासने ऐकून घ्यावी लागत होती. जर सरकार आणि त्यांचे तथाकथित प्रवक्ते रोज दिल्लीशी संपर्क साधूनही त्यांचे जर कुणी ऐकत नाही तर हे सरकार नाकर्ते असल्याचेच आता सिद्ध झाले आहे. यावरून एकतर हे सरकार नाकर्ते आहे किंव्हा त्यांना देशाबाहेर अडकलेल्या गोवेकारांचे काहीच पडून गेलेले नाही हेच सिद्ध होते. मात्र काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले विशेषतः सासष्टीतील आमदार येथे लोकांना केवळ पोकळ आश्वासने देत आहेत अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.