गोव्याच्या राजकीय साठमारीत गोवा फॉरवर्डची परिस्थिती केविलवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 03:41 PM2019-07-12T15:41:05+5:302019-07-12T15:44:52+5:30

काँग्रेसच्या दहा आमदारांना भाजपात घेतल्यामुळे गोव्यातील भाजपाची ताकद वाढली असली तरी त्या सरकारातील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डची स्थिती केविलवाणी झाली आहे.

GOA FORWARD IS IN TROUBLE DAUGHTER IN PRESENT POLITICAL SCENARIO IN GOA | गोव्याच्या राजकीय साठमारीत गोवा फॉरवर्डची परिस्थिती केविलवाणी

गोव्याच्या राजकीय साठमारीत गोवा फॉरवर्डची परिस्थिती केविलवाणी

Next
ठळक मुद्देगोव्याच्या राजकीय साठमारीत गोवा फॉरवर्डची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. आमदारांना आता आपली मंत्रिपदे गमविण्याबरोबरच अस्तित्वासाठीही झुंज द्यावी लागणार आहे.एका बाजूने भाजपाने पंख छाटले असताना गोवा फॉरवर्डला काँग्रेस पक्षाचीही दारे बंद झाली आहेत.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - काँग्रेसच्या दहा आमदारांना भाजपात घेतल्यामुळे गोव्यातील भाजपाची ताकद वाढली असली तरी त्या सरकारातील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डची स्थिती केविलवाणी झाली आहे. या पक्षातील आमदारांना आता आपली मंत्रिपदे गमविण्याबरोबरच अस्तित्वासाठीही झुंज द्यावी लागणार आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपालाच विरोध करीत काँग्रेस पक्षाला सक्षम पर्याय म्हणून गोव्यात गोवा फॉरवर्डला मतदारांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. या पक्षाच्या चारपैकी तीन आमदारांना निवडूनही दिले होते. मात्र निवडणुकीनंतर गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपाबरोबर युती केल्याने या मतदारांकडून तीव्र प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या होत्या.

मात्र हळूहळू मतदारांचा हा रोष मावळू लागला होता. गोवा फॉरवर्ड गोव्याच्या राजकारणात एक महत्वाचा पक्ष बनू पाहत असतानाच भाजपाने काँग्रेसच्या दहा आमदारांना आपल्या पक्षात ओढीत गोवा फॉरवर्ड पक्षाचे महत्व अगदीच शून्य करुन टाकले. त्यामुळे आता या पक्षाची भूमिका काय असेल तेही पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सध्या गोव्यात जे काय घडले आहे त्यावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले सध्याच्या सरकारातील उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी आश्चर्य व्यक्त करताना, सरकार स्थिर असताना भाजपाने हा निर्णय नेमक्या कोणत्या कारणासाठी घेतला हेच कळणे कठीण अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यानंतर दिलेला शब्द पाळण्याची भाजपातील पद्धती आता बदलली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण मनोहर पर्रीकर यांच्या शब्दाखातर सर्वांचा रोष पत्करून भाजपा सरकारला पाठिंबा दिला होता. आणि शेवटपर्यंत गोवा फॉरवर्ड हा पक्ष या सरकारातील सर्वात विश्वासू घटक म्हणून कायम राहिला होता असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. 

सरदेसाई यांचे सरकारातील महत्त्व वाढत असल्यामुळेच आणि भविष्यात ती कदाचित चिंताजनक बाब बनण्याची शक्यता असल्यामुळेच भाजपाने गोवा फॉरवर्डचे पंख छाटले अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चालू आहे. यापूर्वी गोवा फॉरवर्डचा एक मंत्री कमी करुन त्या जागी भाजपाचे मायकल लोबो यांना मंत्री करण्याचा प्रस्ताव सरदेसाई यांच्यासमोर ठेवला होता. मात्र त्यांनी तो फेटाळला होता. या पार्श्वभूमीवर लोबो यांनीही सूचक प्रतिक्रिया व्यक्त करताना, घटक पक्षातील काही मंत्री स्वत: लाच सरकार समजत होते म्हणून भाजपाला हा निर्णय घ्यावा लागला असे म्हटले आहे.

एका बाजूने भाजपाने पंख छाटले असताना गोवा फॉरवर्डला काँग्रेस पक्षाचीही दारे बंद झाली आहेत. यापूर्वी काँग्रेसने सरदेसाई यांना आपल्याबरोबर बोलावले होते. त्यांना मुख्यमंत्री करण्याचीही ऑफर दिली होती. मात्र सरदेसाई यांनी ही ऑफर नाकारली होती. त्यामुळे काँग्रेसही गोवा फॉरवर्डवर नाराज आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसपाशी केवळ पाच आमदार राहिल्यामुळे गोवा फॉरवर्डची त्यांना साथ मिळाली तरी सरकार अस्थिर करण्याएवढे बळ काँग्रेसकडेही राहिलेले नाही. अशा परिस्थितीत गोवा फॉरवर्डची स्थिती मात्र न घर का, ना घाट का अशी झाली आहे. त्यामुळे पुढची दोन वर्षे या पक्षाला आपले अस्तित्व सांभाळून ठेवण्यासाठीच अधिक धडपडावे लागणार आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा कमवावा लागणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीत गोवा फॉरवर्डसाठी हे काम एक आव्हानच आहे.

Web Title: GOA FORWARD IS IN TROUBLE DAUGHTER IN PRESENT POLITICAL SCENARIO IN GOA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.