पणजी : गोवा फॉरवर्डची भाजपबरोबर निवडणूकपूर्व छुपी युती होती. विजय सरदेसाई यांनी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना काँग्रेसलाच समर्थन देणार, असे आश्वासन दिले होते. मात्र, नंतर शब्द फिरविला, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी केला आहे. दुसरीकडे त्यांनी असेही म्हटले आहे की, सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना काँग्रेसला बोलवावे, अशी विनंती करणारे पत्र ११ मार्च रोजी निकालानंतर रात्रीच तयार होते; परंतु पक्ष प्रभारी दिग्विजय सिंग यांनी राज्यपालांच्या निमंत्रणाची वाट पाहू, असे सूचित केल्याने ते दिले नाही. लुईझिन यांनी हल्लाबोल करताना आमदार मायकल लोबो यांनी साळगाव तसेच शिवोली मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामही केले आणि पैसाही ओतल्याचा आरोप केला. सरदेसाई निकालाच्या तीन दिवस आधी पर्रीकरांना भेटले आणि सरकार स्थापनेसाठी गोवा फॉरवर्डचा पाठिंबा देण्याची हमी भाजपला दिली. पर्रीकर यांनीच प्रसारमाध्यमांकडे भांडाफोड केलेला आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसकडून विलंब झालेला नाही, उलट विजय सरदेसाई यांनीच खोटारडेपणा केल्याचे लुईझिन म्हणाले. काँग्रेसने विलंब केला किंवा सुस्त राहिल्याची टीका फेटाळून लावताना लुईझिन म्हणाले की, ११ मार्च रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक त्याच दिवशी बोलावण्यात आली; परंतु काही निकाल रात्री ८.३0 वाजेपर्यंत अधिकृतपणे जाहीर झालेले नव्हते. त्यामुळे संबंधित आमदार पोचू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी रविवारी १२ रोजी पुन्हा बैठक बोलावण्यात आली. विधिमंडळ नेता निवडण्याचे सर्वाधिकार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी तसेच उपाध्यक्ष राहुल गांधी यांना देणारा ठराव घेण्यात आला. सरदेसाई यांनी विधिमंडळ नेतेपदी माझ्या नावाला आक्षेप घेतल्याने मी आधीच शर्यतीतून मागे हटलो. सरदेसाई यांना स्वीकारार्ह असा विधिमंडळ नेता निवडण्यात आला. दुपारी २.३0 वाजता गोवा फॉरवर्डचे प्रणेते ज्यांना काँग्रेस आघाडीचेच सरकार सत्तेवर यावे असे वाटत होते ते फ्रान्सिस कुलासो, दत्ता नायक, क्लिओफात कुतिन्हो व श्रीधर कामत करार निश्चित करण्यासाठी काँग्रेसी शिष्टमंडळाला भेटले; परंतु त्याआधीच सरदेसाई यांनी भाजपबरोबर सोयरिक केली होती. लुईझिन म्हणाले की, पर्रीकर मुख्यमंत्री होत असतील तर भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देऊ, असे पत्र गोवा फॉरवर्डतर्फे सरदेसाई यांनी भाजपला दिले अशाच प्रकारचे पत्र काँग्रेसलाही देता आले असते; परंतु सरदेसाई यांनी तसे केले नाही. पर्रीकर हे आमदार नसतानाही सरदेसाई यांनी त्यांना पत्र दिले. ते भाजप नेते आणि मायकल लोबो यांच्या संपर्कात होते. सरदेसाई यांच्याबरोबर आपण चार बैठका आधीच घेतलेल्या आहेत, असे लोबो यांनी पत्रकारांना सांगितले. त्यात बरेच काही दडलेले आहे. राज्यपालांना पत्र देण्यापासून रोखणारी दिग्विजय सिंग यांची कृती महागात पडली काय, असा सवाल केला असता ‘मी कोणाला दोष का म्हणून द्यावा,’ असा उलट प्रश्न लुईझिन यांनी केला. ईशान्येतील जबाबदारीतून मुक्त करून पक्षानेच मला गोव्यात पाठविले होते. मी स्वत:हून आलेलो नाही आणि कोणत्याही पदाची अपेक्षाही नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गोवा फॉरवर्डची भाजपबरोबर होती निवडणूकपूर्व छुपी युती
By admin | Published: March 18, 2017 2:51 AM