गेले काही दिवस सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा आणि आरजीचे प्रमुख मनोज परब यांच्यात वाद सुरू आहे. एकमेकांवर शाब्दिक हल्ले करतानाच एकमेकांस खोचक सल्लेही दिले जात आहेत. सिल्वेरा यांना आम्ही कामावर ठेवू नोकरी देऊ असे अगोदर मनोज परब यांनी जाहीर केले होते. त्यानंतर सिल्वेरा यांचे काही समर्थक व कार्यकर्ते खवळले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सिल्वेरा किती मोठे व्यावसायिक आहेत, याची माहिती गोमंतकीयांना दिली. काल सिल्वेरा यांनी स्वत: मीडियाशी बोलताना परब यांनाच आपण नोकरी देतो असे जाहीर केले. दरमहा पन्नास हजार रुपये पगारावर आपल्या घरी, आपल्या कार्यालयात मनोज परब यांनी नोकरीस यावे. अगदी उद्यापासून काम सुरू करावे, आपल्या कुटुंबाकडे दहा-बारा ट्रॉलर्स आहेत, असे सिल्वेरा यांनी जोशात जाहीर केले. सिल्वेश कुटुंब हे पारंपरिक मासेमारी व्यवसायात असून आम्ही चारशे लोकांना रोजगार दिलेला आहे, असे सिल्वेरा यांनी अभिमानाने सांगितले.
वास्तविक सिल्वेरा यांच्यासह भाजपमधील जे पराभूत आमदार आहेत, त्या सर्वांनीच आपल्या पराभवाची कारणमीमांसा जाणून घेण्याची वेळ आली आहे. एकदा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा जिंकून येतोच असे नाही. अनेक जण राजकीयदृष्ट्या इतिहासजमा होतात. पाच वर्षापूर्वी जे आमदार चकचकीत बूट, ब्रँडेड कपडे, हातात सोन्याचे मास्कोत घालून फिरत होते, ते आता पराभूत होऊन घरी बसले आहेत. मग लोकही त्यांना असे विसरून जातात ते माजी आमदार आहेत अशी नोंददेखील जनतेच्या मनात राहत नाही. एकेकाळी सांगेत (स्व.) प्रभाकर गावकर नावाचे आमदार होऊन गेले. त्याच सांगेत प्रसाद गावकर एकदा जिंकले व दुसऱ्यावेळी पराभूत झाले. शिवोलीत विनोद पालयेकर आमदार झाले, मैत्रीही झाले, मग पुढच्या निवडणुकीत त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सिल्वेरा, सांताक्रूझचे टोनी फर्नाडिस, वेळीचे फिलीप नेरी, नुवेचे बाबाशान वगैरे अनेक जण भाजपमध्ये गेले होते. यापैकी बहुतेक जण पराभूत झाले. आता सांताक्रूझमध्ये पुन्हा कधी टोनी आमदार होतील असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. बाबाशान पुन्हा विधानसभेत पोहोचतील किंवा कुंकळीचे क्लाफास डायस पुन्हा जिंकतीलच असे आजच्या टप्प्यावर म्हणता येत नाही. सांतआंद्रे मतदारसंघातील सध्याची स्थिती पाहता सिल्वेरा यांनादेखील विचार करावा लागेल, काँग्रेसच्या तिकिटावर निवडून यायचे व मग भाजपमध्ये उडी टाकायची आणि पराभूत झाल्यानंतर आपल्या पराभवाची खरी कारणे न शोधता भलतेच काही तरी बोलत राहावे, हे आश्चर्यजनक आहे.
आरजीचे उमेदवार विरेश बोरकर जास्त पैसे खर्च न करताही सांतआंद्रेत जिंकले. ते का जिंकले याची खरी कारणे सिल्वेरा आजदेखील सांगू शकत नाहीत. बोरकर यांनी तिथे काही करिश्मा केला नव्हता. ते प्रस्थापित राजकारणी नव्हते, पण लोकांनाच मतदारसंघात बदल हवा होता. म्हणून ते जिंकले. सांताक्रूझमध्ये मतदारांना टोनी नको झाले, त्यामुळे रुदोल्फ फर्नाडिस जिंकले. जयेश साळगावकर यांना साळगावमध्ये दुसऱ्यांदा लोकांनी स्वीकारले नाही.
मंत्रिपद भूषविलेले अनेक नेतेही पराभूत होतात. अनेक जण वन टाइम आमदार ठरतात. सहा महिन्यांपूर्वी जे आठ आमदार भाजपमध्ये गेले आहेत, त्यापैकीदेखील काही जण पुढील विधानसभा निवडणुकीत गटांगळ्या खातील. निवडणुकीत पैसा कितीही खर्च केला, तरी जिंकता येतेच असे नाही; हा अनुभव अनेक कथित महारथींनीही घेतला आहे. बाबूश मोन्सेरात पणजीत गेल्या निवडणुकीवेळी कमी मतांनी जिंकले. कुडचडेत नीलेश काब्राल यांचीही गेल्या निवडणुकीत प्रचंड दमछाक झाली. नवख्या उमेदवारांनी प्रस्थापितांना गेल्या निवडणुकीत दमविले आहे. सिल्वेरा यांना सांतआंद्रेत नव्याने प्रभाव निर्माण करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. नवे आमदार वीरेश बोरकर हे काहीच विकास करू शकलेले नाहीत, अशी टीका सिल्वेरा करतात. सिल्वेरा यांचा तो दावा खरा असेल तर पुढील निवडणुकीत लोक योग्य तो कौल देतील. मात्र, त्यांनी सध्या चालविलेला शाब्दिक वाद हा त्यांच्या फायद्याचा नाही. अर्थात आरजीनेही अगोदर आपण सिल्वेरा यांना नोकरीस ठेवतो अशी भाषा वापरायलाच नको होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"