- पंकज शेट्ये वास्को - बुधवारी (दि.२४) संध्याकाळी साकवाळहून वास्को रेल्वे स्थानकावर येणाऱ्या मालवाहू रेल्वेच्या एका वॅगन (डबा) चे चाक घसरून रुळावरून बाहेर आले. मालगाडीचा एक डब्बा घसरून रुळाबाहेर आल्याने त्या रेल्वे मार्गावर अडथळा निर्माण झाल्याने वास्को रेल्वे स्थानकावरून पटना जाणारी वास्को - पटना एक्सप्रेस (१२७४१) प्रवासी रेल्वे सुमारे दोन तास उशिरा निघणार असल्याची माहीती मिळाली.
वास्को रेल्वे स्थानकावरील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी ५ च्या सुमारास ती घटना घडली. वास्को रेल्वे स्थानकाच्या परिसरात रेल्वेचे काही काम चालू आहे. त्यासाठी रेल्वे रुळावर घालण्यात येणारी खडी (ब्लास्ट स्टोन) घेऊन एक मालगाडी (मालवाहू रेल्वे) वास्को रेल्वे स्थानकाच्या परिसरात येत होती. जेव्हा मालगाडी तानिया हॉटेल परिसराजवळ असलेल्या रेल्वे रुळावर पोचली त्यावेळी मालगाडीच्या एका डब्याचे चाक घसरून रेल्वे रुळाबाहेर आले. मालगाडीच्या वॅगनचे चाक रुळाबाहेर आल्याने तेथे अडथळा निर्माण झाला आहे. तो अडथळा दूर करण्याचे काम रेल्वे कामगार - कर्मचाऱ्यांनी सुरू केला आहे. बुधवारी रात्री ९ ते ९.३० पर्यंत रुळाबाहेर गेलेली मालगाडीचे वॅगन पुन्हा रुळावर आणण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. सुमारे १५ वॅगन (डबे) सहीत येणाऱ्या मालगाडीचे एक वॅगन रुळाबाहेर जाऊन अडथळा निर्माण झाल्याने वास्को स्थानकावरून पटना जाण्यासाठी निघणारी प्रवासी रेल्वे अडथळा दूर केल्यानंतर उशिरा निघणार असल्याची माहीती मिळाली. वास्को - पटना एक्सप्रेस बुधवारी रात्री ७ वाजता निघते. घसरून रुळाबाहेर आलेले वॅगन तेथून हटविल्यानंतर नियमित वेळेपेक्षा वास्को - पटना एक्सप्रेस रेल्वे सुमारे दोन ते अडीच तास उशिरा रवाना होण्याचा अंदाज आहे. दरम्यान बुधवारी रात्री वास्कोहून बेंगलोर जाण्यासाठी यशवंतपूर एक्सप्रेस रेल्वे निघत असून त्या प्रवासी रेल्वेच्या निघण्याच्या वेळेपूर्वी रुळावरून घसरलेले वॅगन तेथून हटवण्यात येणार असल्याचा अंदाज असल्याने ती रेल्वे वेळेत निघणार असल्याची माहीती मिळाली.