गोवा : मंत्रिमंडळ विस्ताराविषयी भाजपामध्ये कुरबूर का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 11:58 AM2018-09-26T11:58:37+5:302018-09-26T12:10:53+5:30
काँग्रेसच्या सोळा आमदारांनी सही करून आपल्याला पदावरून काढण्यासाठी जी नोटीस दिली आहे, त्या नोटीसीविषयी मी बुधवारी सायंकाळी किंवा गुरुवारपर्यंत म्हणजे लवकरच निर्णय घेईन, असे गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे सांगितले.
पणजी : आजारी मंत्र्यांना वगळून पर्रीकर सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर भाजपामध्ये व सत्ताधारी आघाडीत कुरबुरी का वाढल्या याचा शोध सध्या भाजपाचे काही प्रमुख पदाधिकारी घेत आहेत. लोकसभा निवडणुकांना यापुढे सामोरे जावे लागणार असून अशावेळी पक्षात व सत्ताधारी आघाडीत कुरबुरी नको असे भाजपाच्या कोअर टीमच्या काही सदस्यांनाही वाटते. तथापि, मंत्रिमंडळ विस्तारानंतर पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये रुसवेफुगवे वाढले आहेत.
मला कार्यकर्त्यांनी सांगितले तर मी कोणताही निर्णय घेण्यास तयार आहे अशा प्रकारचे विधान मंत्रिमंडळातून वगळलेले भाजपाचे माजी मंत्री व विद्यमान आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी केले आहे. डिसोझा यांच्या म्हापशातील भाजपा कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. काही नगरसेवकही आक्रमक झाले आहेत. राजेश पाटणोकर, प्रमोद सावंत, मायकल लोबो, ग्लेन तिकलो अशा काही भाजपा आमदारांचे कार्यकर्ते आपल्या आमदारांसाठी मंत्रिपद मागत आहेत. कळंगुट मतदारसंघातील शेकडो टॅक्सी व्यवसायिक हे आमदार मायकल लोबो यांचे पाठीराखे आहेत. लोबो यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसेल तर येत्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही भाजपासाठी काम करणार नाही, असा इशारा टॅक्सी व्यवसायिकांनी दिला आहे.
मंत्रिमंडळात निलेश काब्राल व मिलिंद नाईक ह्या दोन आमदारांना स्थान देताना भाजपच्या श्रेष्ठींना जातीय व धार्मिक समीकरणे सांभाळावी लागली. फ्रान्सिस डिसोझा हे ख्रिस्ती धर्मिय नेते असून त्यांना वगळल्याने त्यांच्या जागी निलेश काब्राल ह्या दुस-या ख्रिस्ती धर्मिय नेत्याला स्थान देणो भाजपसाठी गरजेचे ठरले. मात्र काब्राल यांच्यापेक्षा लोबो यांचे योगदान गोव्यात भाजपाप्रणीत आघाडी सरकार घडविण्यासाठी खूप मोठे आहे, असे कळंगुटमधील भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याच कारणास्तव लोबो यांना मंत्रिपद द्यावे असे कार्यकर्त्यांना वाटते. कार्यकर्त्यांनी पणजीत धाव घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्यासमोर आपली कैफियत मांडली आहे. पांडुरंग मडकईकर हे कुंभारजुवे मतदारसंघातून निवडून आले होते. ते वीजमंत्री होते. त्यांना डच्चू दिल्याने कुंभारजुवेतील भाजपा कार्यकर्ते आक्रमक बनले. त्यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी भेट घेतली तेव्हा कार्यकर्त्यांनी प्रश्नांच्या फैरी झाडल्या. आपले पती मडकईकर यांना विश्वासात न घेताच भाजपाने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला असे मडकईकर यांच्या पत्नी जेनिता मडकईकर यांचे म्हणणो आहे.
भाजपा कार्यकर्त्यांमधील रुसवेफुगवे दूर करण्याची जबाबदारी प्रदेश भाजपाच्या कोअर टीमवर येऊन पडली आहे. कोअर टीमच्या काही सदस्यांनी आपले मोबाइल फोनही बंद केले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तरी पक्षातील कुरबुरी बंद व्हायला हव्यात अन्यथा समस्या निर्माण होईल, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीचा गोवा फॉरवर्ड हा घटक पक्ष आहे. या पक्षाचे नेते असलेले मंत्री विजय सरदेसाई हेही मंत्रिमंडळ विस्तारावर हवे तेवढे खूष नाहीत. मंत्रिमंडळ विस्तार ही भाजपाअंतर्गत बाब आहे पण सर्व मंत्र्यांना विश्वासात घेतले असले तर विस्तार चांगल्या प्रकारे झाला असता,असे मंत्री सरदेसाई यांनी म्हटले आहे.