ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 5 - गोव्यातील भाजपप्रणीत आघाडी सरकारचा पाठिंबा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने गुरुवारी काढून घेतला. पाठींबा काढत असल्याचे पत्र म.गो.ने राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या कार्यालयास सादर केले व गेल्या पाच वर्षांतील म.गो.-भाजप युती अधिकृतरित्या गुरुवारी संपुष्टात आली.
आम्ही पाच वर्षे भाजपसोबत राहिलो व अनेक कटू अनुभव घेतले. युती तोडण्यासाठी भाजपने आम्हाला प्रवृत्त केले. आमच्या मतदारसंघातील विकासाकडे दुर्लक्ष करणे, आमच्या फाईल्स अडविणे आणि आमच्या खात्यातील नोकर भरती रोखणे असे प्रकार भाजप सरकारने केल्याचे म.गो.चे अध्यक्ष आमदार दीपक ढवळीकर यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी झालेल्या आंदोलनातून जन्मास आलेल्या गोवा सुरक्षा मंच पक्षासोबत आम्ही युती करणे तत्त्वत: मान्य केले आहे. आम्ही विधानसभेच्या बावीस जागा लढवू. गोवा सुरक्षा मंच ऊर्वरित जागा लढवेल. गोव्यात लोकांना प्रादेशिक पक्षांचेच सरकार अधिकारावर आलेले हवे आहे असा दावा ढवळीकर यांनी केला. दरम्यान, चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपचे स्वत:चे एकवीस आमदार आहेत. त्यामुळे म.गो. पक्षाने पाठिंबा काढून घेतला तरी सरकार अल्पमतात आलेले नाही.(खास प्रतिनिधी)