पणजी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत गोरक्षकांच्या दबावामुळे गोव्यात बीफचा तुटवडा असतानाही सरकार निष्क्रिय राहिल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते फ्रान्सिस्क सार्दीन यांनी केला आहे. सरकारने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.गोव्यात बीफचा तुडवडा हा निर्माण झालेला तुटवडा हा नैसर्गिक नसून कृत्रिम असल्याचा दावा सार्दीन यांनी केला आहे. हे कारस्थान गोरक्षकांनी केले असून त्यांचा अजेंडा लादण्याचा हा प्रयत्न आहे आणि सरकार त्यांना साथ देत आहे, असे त्यांनी सांगितले. गोवा मांस प्रकल्पातही या लोकांची दहशत आहे. बीफ विक्रेत्यांनाही ते दहशतीत ठेवतात आणि बीफ खाणा-यांंवरही दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.गोव्यासारख्या पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर असलेल्या राज्यात बीफची मागणीही मोठ्या प्रमाणावर आहे. बीफ समस्यामुळे पर्यटन व्यवसायावरही परिणाम होत आहे. एखाद्या वस्तुचा पुरवठा कमी झाला की ती वस्तु महागते आणि एकदा वर गेलेल्या किमती कधी खाली येत नसतात. त्यामुळे सरकारने त्वरित कारवाई करून समस्या निवारण करण्याची ही वेळ आहे, असे ते म्हणाले.राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आतापर्यंत एकही निर्णय जनहिताचा घेतलेला नाही. जीएसटी लागू करून महागाई वाढविली. लोकोपयोगी वस्तुंवर मोठ्या प्रमाणात कर लागू करण्यात आला. नंतर जनतेचा संताप अनावर झाल्यामुळे ब-याच वस्तू या कमी कराच्या गटात आणाव्या लागल्या. परंतु त्यामुळे वाढलेल्या किमती मात्र खाली आलेल्या नाहीत. बीफचेही तसेच होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला.बीफचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मुख्यमंत्र्यांनी कोणतीही भुमिका न घेता समस्या ताठकळत ठेवल्यास जनक्षोभ उसळेल. कॉंग्रेस पक्ष त्यासाठी आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या बरोबर कॉंग्रेसचे प्रधान सरचीटणीस आल्तिन गोम्स आणि उत्तर गोवा कॉंग्रेस अध्यक्ष विजय बी के उपस्थित होते.
गोवा सरकार गोरक्षकांच्या दबावाखाली, कॉंग्रेस नेत्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 9:44 PM