- सद्गुरू पाटीलपणजी : गोव्याला प्रथमच पर्यटकांची भीती वाटू लागली आहे. गोव्यात तूर्त पर्यटक नकोत अशा प्रकारची भूमिका प्रथमच गोव्यातील लोक व सरकारही घेऊ लागले आहे. परिणामी गोव्याचा पर्यटन व्यवसाय जून किंवा जुलैमध्ये सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. पर्यटन सुरू होणे डिसेंबरपर्यंत तरी लांबणीवर पडले आहे.गोवा ग्रीन झोनमध्ये असला तरी, गोव्यात पर्यटक नको अशी भूमिका घेण्याची वेळ गोमंतकीयांवर आली आहे. गोव्याची अर्थव्यवस्था खनिज व्यवसाय व पर्यटन व्यवसायावर अवलंबून असली तरी, कोरोना रुग्णसंख्या वाढायला नको या भीतीपोटी गोवा सरकारही सतर्क झाले आहे. सरकारमधील काही मंत्री पर्यटन व्यवसाय मे महिन्याच्या अखेरपासून सुरू व्हायला हवा, असा आग्रह धरत होते. पण त्यांनीदेखील आता आपला सूर बदलला आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मंत्री मायकल लोबो वगैरे अगोदर प्रत्येकाचा जीव वाचवूया, मग पर्यटनाविषयी बोलूया अशी भूमिका घेऊ लागले आहेत.गोव्यात दोन दिवसांत कोरोनाचे आठ रुग्ण सापडले. हे आठहीजण गोव्याबाहेरून आले. परप्रांतांमधून जे गोव्यात येतात, ते कोरोना विषाणूच घेऊन येतात अशा प्रकारची गोमंतकीयांची भावना बनली आहे. कारण फेब्रुवारी व मार्च महिन्यात जे सात कोरोना रुग्ण गोव्यात सापडले होते, त्यापैकी सहाजण परप्रांतांमधूनच आले होते. सध्या आठ रुग्णांवर गोव्यात उपचार सुरू आहेत. गोव्यात रुग्णसंख्या वाढू द्यायची नसेल व गोव्याचा ग्रीन झोन दर्जाही कायम ठेवायचा असेल तर गोव्याला पर्यटन व्यवसाय सध्या काही महिने बंदच ठेवावा लागेल असे अनेक आमदारांनाही वाटते. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी तर सध्या रेस्टॉरंट्स, स्मीमिंग पुल, सिनेमागृहे वगैरे सुरू करू नयेत अशी भूमिका मांडली आहे.कोरोना संकटापूर्वी गोव्यात जगभरातून अधिकाधिक पर्यटक यावेत म्हणून सरकार प्रयत्न करत होते. त्या प्रयत्नांमुळेच गोव्याला वार्षिक ऐंशी लाख पर्यटक भेट देत होते. मात्र गोव्याचा पर्यटन धंदा आता शून्यावर आला आहे. गोव्याच्या किनारपट्टीवर शुकशुकाट आहे. किनारे ओसाड पडले आहेत. एकच शॅक (पर्यटन गाळा) वागातोर येथे सुरू होता. त्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करून तो बंद केला. मंत्रिमंडळाच्या गेल्या बैठकीत काही मंत्र्यांनी चहाची हॉटेल्स, रेस्टॉरंट्स वगैरे सुरू करायला हवी अशी भूमिका मांडली होती. मंत्री लोबो यांचाही तसा आग्रह होता. सरकार येत्या 17 रोजी त्याविषयी काय ती भूमिका निश्चित करील पण सध्या कुणीच गोमंतकीय रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण्याच्या स्थितीत नाहीत.कोकणात रुग्ण वाढतात गोवा अन्य राज्यांपेक्षा सुरक्षित असल्याने गोव्याचा पर्यटन धंदा सुरू करता येईल असे गेल्या आठवडय़ार्पयत अनेकांना वाटत होते. किनारपट्टीतील हॉटेल्स केवळ पर्यटनावर अवलंबून होती. त्यांच्याकडून अनेक कामगारांचा सांभाळ केला जातो पण सध्या स्थितीच भयावह असल्याने पर्यटकांचे स्वागत गोवा सरकारही करू पाहत नाही. गोव्याच्या शेजारील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कर्नाटकमध्येही कोरोना रुग्ण सापडत असल्याने देशी पर्यटकही गोव्याला नकोसे झाले आहेत. कोकणपट्टीत कोरोना रुग्ण असल्याने गोव्याला अधिक काळजी घ्यावी लागते. गोव्यापासून केवळ तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या दावणगिरी येथे ग्रीन झोनमध्ये 22 कोरोना रुग्ण सापडले.गोव्याचे पर्यटन पूर्ण बंद आहे.गोव्यात कोणताच उद्योग सध्या चालू नाही व त्यामुळे सरकारलाही महसुल येत नाही, असे गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष असलेले उद्योगपती मनोज काकुलो म्हणाले. लोकांकडे जेवायला पैसे नाहीत. खाण धंदा तरी अशावेळी सुरू व्हायला हवा, असे मत काकुलो यांनी व्यक्त केले. त्यांनी कोरोना काळात पर्यटन धंदा सुरू करा अशी मागणी केलेली नाही. खाणी सुरू व्हाव्यात म्हणून काकुलो शुक्रवारी राज्यपालांना भेटले.कोरोनाचे संकट लवकर आटोक्यात येण्यासारखी स्थिती नाही. पण कोरोना काळात काळजी घेऊनच पुढे जावे लागेल. कायम घरी बसून चालणार नाही. घरी बसून उपजिविका चालणार नाही. काही प्रमाणात तरी आपआपले व्यवसाय सुरू करावे लागतील व ते करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तोंडाला मास्क बांधणे गरजेचे आहे. लोकांच्या मनातील भीती जायला हवी. लोक बाहेर आले की, गोव्याचे पर्यटनही आपोआप हळूहळू सुरू होईल. सोशल डिस्टन्सिंगची मात्र सक्ती असावी. कुठेच गर्दी होऊ नये.- सदानंद तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष परप्रांतीय मोठ्या संख्येने रेल्वेतून गोव्यात येऊ पाहतात, याविषयी सरकारला चिंता वाटते व त्यामुळेच सध्या रेल्वेने गोव्यात स्टॉप घेऊ नये असे गोवा सरकारला वाटते. केंद्रासमोर आम्ही आमची चिंता मांडली आहे. गोव्यात हॉटेल्स बंद आहेत. गोव्यात कुणी मौजमजा करण्यासाठी सध्या येऊ नये.- मुख्यमंत्री प्रमोद सावंत
गोव्याला प्रथमच सतावतेय पर्यटनाची भीती; व्यवसाय सुरू होणे लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 3:28 PM