पणजी - राज्याच्या तपास नाक्यांवर गेल्या तीन दिवसांत एकूण 225 मासळीवाहू वाहनांना थांबवून त्यामधील माशांची अन्न व औषध प्रशासन खात्याच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी तपासणी केली. मासळीमध्ये फॉर्मेलिन आहे की नाही याची तपासणी करून गोमंतकीयांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न एफडीएने केला आहे.
मासळीची आयात ही गोवा सरकारने पंधरा दिवसांसाठी थांबवली होती. आंध्रप्रदेश आणि काही भागातून येणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलिन असते अशी चर्चा सुरू झाल्यानंतर सरकारने मासळीची आयात थांबवली होती. गेल्या 4 ऑगस्टपासून पुन्हा आयात नव्याने सुरू झाली. गेल्या तीन दिवसांत 225 वाहने कर्नाटक व महाराष्ट्रातून गोव्यात आली. मध्यरात्री साडेबारा वाजता वाहने येण्यास रोज सुरुवात होते व पहाटे साडेतीनच्या सुमारास शेवटचे मासळीवाहू वाहन गोव्यात येत असल्याचं दिसून आले आहे.
पहिल्या दिवशी म्हणजे 4 ऑगस्ट रोजी कमी वाहने आली, मात्र 5 ऑगस्ट रोजी 94 वाहने पत्रदेवी व पोळेमार्गे गोव्यात आली. तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (6 ऑगस्ट) पहाटे 74 वाहने गोव्यात आली. पापलेट, दोडयारे, सुंगटे अशा प्रकारची मासळी घेऊन ही वाहने गोव्यात आली. अन्न व औषध प्रशासन खाते, पोलीस आणि मच्छीमार खाते यांचे अधिकारी असलेली पथके अजून तरी मध्यरात्री व पहाटे सीमांवर उपस्थित राहतात. रोज ट्रक आणि अन्य मासळीवाहू वाहनं थांबविली जातात. गोवा सरकारने मासळी तपासायला सांगितले आहे याची कल्पना ट्रक चालकांना दिली जाते. त्यांच्याकडे कागदपत्रे मागितली जातात.
माशांची तपासणी करण्यासाठी नमूने घेतले जातात. काहीवेळा काही चालक स्वत: हून मासळीचे नमूने देतात ते मुद्दाम न स्वीकारता एफडीएचे अधिकारी आपल्याला हवे ते मासे तपासणीसाठी काढतात व त्यात फॉर्मेलिन आहे की नाही याबाबत शास्त्रीय पद्धतीने तिथेच चाचणी केली जाते. अजून एकाही माशात फॉर्मेलिन हे घातक रसायन आढळलेले नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शंका व्यक्त केली आहे. एफडीएकडे मासे तपासण्याबाबतची पूर्ण सज्जता नाही असे चोडणकर यांचे म्हणणे असून अजून काही दिवस गोवा सरकारने आयात बंद ठेवावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. गोव्यात मच्छीमार व ट्रॉलर व्यवसायिकांनी मासळी पकडणे सुरू केले आहे. त्यामुळे गोव्याबाहेरील मासळीची सध्या गोमंतकीयांना गरज नाही, असे चोडणकर यांचे म्हणणे आहे.