पणजी : महाराष्ट्राने तब्बल सात वर्षांच्या विश्रांती नंतर म्हादईची उपनदी असलेल्या वाळवंटी नदीवर विर्डी धरणाचे काम पुन्हा युद्ध पातळीवर सुरू केल्याने गोव्यावर जलसंकट ओढवण्याची भीती आहे. या बेकायदा कृतीची गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली असुन आज (सोमवारी) सकाळी जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने धरण भागाची पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी या संदर्भात तातडीने कृती करताना गोवा जलसंसाधन खात्याचे तसेच म्हादई सेल कार्यकारी अभियंता दिलीप नाईक व त्यांच्या टीमला विर्डी येथे जाऊन सविस्तर अहवाल व एकूण परिस्थितीचे निरीक्षण करण्यास पाठवले. सदर टीमने या भागाची पाहणी केली असुन ते आपला अहवाल सदर करणार असल्याचे सांगण्यात आलें.
दरम्यान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतलेले असुन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी नसल्याने असे काम सुरू करता येत नाही त्यामुळे या बाबत आवश्यक पावले तातडीने उचलण्यात येत असून अहवाल हाती येताच पुढील कृती कारण्याच्याबाबत निश्चित केले आहे.