सचिन कोरडे
पणजी - ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी शोची लोकप्रियता संपूर्ण देशात पसरली आहे. भाऊ कदम, कुशल बंद्रीके, भारत गणेशपुरे आणि सागर करंडे, श्रेया बुगडे ही नावे आता महाराष्ट्रासह इतर राज्यांतही प्रत्येक घराघरांत पोहोचली आहेत. जबरदस्त विनोदी शैलीच्या जोरावर या चौघांनी बुधवारी(30 जानेवारी) गोमंतकीयांनाही पोठ धरुन हसवले. यास गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा या सुद्धा अपवाद ठरलेल्या नाहीत. सिन्हा या देखील कलाकारांच्या प्रत्येक ‘पंच’वर हसत होत्या. ‘तुम्हारी हास्यनाटिका देखकर खूप मजा आया...लोगोको हसाना सबसे कठीण बात होती है..आपने वो सहज तरिकेसे कर दिखाया...मेरी आपको शुभकामनाए...अशा शब्दांत सिन्हा यांनी कलाकाराचे कौतुक केले.
गोव्यात पहिल्यांदाच ‘स्वाभिमान-२०१८’ हा पोलिसांसाठी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. कला अकादमीच्या दर्या संगमवरील खुल्या जागेत मोठ्या थाटात हा कार्यक्रम झाला. या निमित्त ‘चला हवा येऊ द्या ची टीम’ गोव्यात आली होती. खास राज्यपालांसाठी या टीमने हिंदी भाषेत एक हास्यनाटक सादर केले. उल्लेखनिय म्हणजे, खुल्या रंगमंचावर या टीमकडून हिंदी भाषेतील हा पहिलाच प्रयोग होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत या कलाकारांनी गोमंतकीयांना हसवले. शिक्षक आणि मस्तीखोर विद्यार्थ्यामधील संवाद यावर हे नाट्य होते. भारत गणेशपुर यांची शिक्षकी भूमिका छाप सोडून गेली.
दयासंगवरील काही क्षण...
कार्यक्रमाला उशीर झाल्याने भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि कुशल बंद्रिके या चौघांनी कला अकादमीच्या मागच्या बाजूला असलेल्या जेटीवर थोडा वेळ घालवला. याच ठिकाणी 'भूतनाथ' या चित्रपटाची शूटिंग झाले होते. आता ही जेटी पाडण्यात आली आहे परंतु, त्याचा काही भाग अजूनही आहे. अत्यंत शांत आणि काळोखात हे चारही जण खुर्च्या टाकून बसले. चा चौघांनी आपल्या गोव्याबद्दलच्या आठवणी एकमेकांना शेअर केल्या.
व-हाडी भाषेचा प्रयोग यशस्वी : गणेशपुरे
प्रत्येक भाषेचा लहेजा असतो. महाराष्ट्रातच बघा ना.. मराठी भाषा वेगवेगळ्या ‘टोनिंग’मध्ये बोलल्या जाते. पण त्या सर्वच चित्रपटात उतरतात असे नाही. कारण प्रेक्षक ते स्वीकारतील की नाही, याची भीती मनात असते. मराठवाड्याची बोली आता ब-याच चित्रपटातून पुढे येत आहे. पण व-हाडी बोली मर्यादित होती. चला हवा येऊ द्या या शोमध्ये काही तरी वेगळं सादर करण्याच्या नादात मी व-हाडी बोलून जातो. ते प्रेक्षकांना आवडायला लागलं.. हा प्रयोग यशस्वी झाला याचं समाधान आहे. याच बोलीमुळे काही वेगळं अस्तीत्वही निर्माण करु शकलो. व-हाडी भाषेतील ‘नाळ’ आणि आता ‘झुंड’ ज्यात अमिताभ बच्चनाही आहेत असे चित्रपट येत आहेत...हे सर्व प्रेक्षकांनी स्वीकारल्यामुळेच शक्य आहे, असे भारत गणेशपुरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.