सात कोटींच्या जमिनीसाठी शिरोडकरांना सरकारकडून 70 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 03:32 PM2018-10-20T15:32:13+5:302018-10-20T15:43:23+5:30
काँग्रेस पक्षातून फुटून भाजपात सामील झालेले शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याकडे सरकारने केलेला जमीन खरेदी व्यवहार हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी केला आहे.
मडगाव - काँग्रेस पक्षातून फुटून भाजपात सामील झालेले शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याकडे सरकारने केलेला जमीन खरेदी व्यवहार हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसचेगोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी केला आहे. या जमिनीची किंमत केवळ सात कोटी असूनही शिरोडकर यांच्याकडून 70 कोटी रुपयांना ती सरकारने विकत घेतली असा आरोप त्यांनी केला. या व्यवहाराला काँग्रेस पक्ष न्यायालयात आव्हान देणार असेही डॉ. चेल्लाकुमार म्हणाले.
शिरोडकर हे काँग्रेसमधून फुटण्यामागे हा जमीन खरेदी व्यवहारच असल्याचा दावा त्यांनी केला. त्यापूर्वी शिरोडकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या जमीन व्यवहारात कुठलेही गौडबंगाल नसून शिरोडय़ात जो बाजारभाव चालू आहे. त्या बाजारभावाने ही जमीन विकत घेतली असा दावा केला होता.
मडगावात पत्रकारांशी बोलताना चेल्लाकुमार यांनी हा दावा खोडून काढताना, या जमिनीच्या शेजारी आणखी जमीन असून त्या जमीन मालकाने बऱ्याच कमी किंमतीत आपली जमीन सरकारला विकण्याची तयारी दाखविली होती. तशा आशयाचे पत्रही औद्योगिक विकास महामंडळाला पाठविण्यात आले होते. सरकारने ही कमी किंमतीची जमीन का विकत घेतली नाही असा सवाल त्यांनी केला. लवकरच या सर्व व्यवहाराला काँग्रेस न्यायालयात आव्हान देणार असे त्यांनी सांगितले.
शिरोडा व मांद्रे या दोन्ही मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पोट निवडणुकीत जिंकून आणण्यासाठी काँग्रेसने सर्व प्रयत्न सुरु केलेले आहेत. या दोन्ही मतदारसंघातील मतदार या फुटीरांना धडा शिकवेल असा दावा त्यांनी केला. शिरोडा मतदारसंघातून सुभाष शिरोडकर तर मांद्रे मतदारसंघातून दयानंद सोपटे या दोन यापूर्वी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या माजी आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यामुळे येत्या सहा महिन्यात या दोन्ही मतदारसंघात पोट निवडणूक होणार आहे.