गोव्यात ७८.९४ टक्के मतदान; प्रस्थापितांच्या बाबतीत धक्कादायक निकालाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 10:14 PM2022-02-14T22:14:35+5:302022-02-14T22:27:41+5:30
सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली.
पणजी : गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी सर्वत्र शांततेत मतदान झाले. ७८.९४ टक्के मतदान झाले असून मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद दिसला. सरकारविरुध्द कौल जाऊन काही मतदारसंघांमध्ये प्रस्थापितांच्या बाबतीतही धक्कादायक निकाल लागू शकतात. नवे चेहरे विधानसभेत येण्याची शक्यता असून १० मार्च रोजी मतमोजणीअंती चित्र स्पष्ट होईल.
सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. अनेक केंद्रांवर सकाळीच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या यात महिला मतदारांचा समावेश होता. किरकोळ घटना वगळता कुठेही अनुचित घटना घडल्याची नोंद नाही. डिचोली, शिवोली, म्हापसा, ताळगाव, कुंभारजुवें, सांताक्रुज, सांत आंद्रे, सांगे, मयें, कुडतरी, बाणावली आदी मतदारसंघांमध्ये प्रस्थापितांची दमछाक झाली. बदलाचे वारे असल्याने धक्कादायक निकाल येऊ शकतात.
महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, सभापती राजेश पाटणेकर, आमदार ग्लेन तिकलो, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस, सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा आदी भाजप उमेदवार तसेच तृणमूलचे बाणावलीचे उमेदवार चर्चिल आलेमांव यांच्यासाठी निकाल धक्कादायक ठरु शकतात.
साखळीत सर्वाधिक ८९.६४ टक्के-
उत्तर गोव्यात ७९.८४ टक्के तर दक्षिण गोव्यात ७८.१५ टक्के मतदान झाले. मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात सर्वाधिक ८९.६४ टक्के मतदान झाले आहे. सर्वात कमी ७०.०२ टक्के मतदान बाणावली मतदारसंघात झाले आहे. आचारसंहिता भंगाची चार प्रकरणे नोंद झाली.