पणजी - गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागरातून युवकाचा मृतदेह गायब होण्याच्या घटनेनंतर आपला बेजबाबदारपणा उघडकीस येवू नये यासाठी वस्तुस्थिती सांगणाऱ्या शवागाराच्या कर्मचाऱ्यावर फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. एडमंड रॉड्रिगीस यांनी डोळे वटारुन त्याला चूप बसविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
'हा 45 वर्षीय मृतदेह वाटत नाही, मृतदेह तरूण व एकदम फ्रेश वाटतो असे मी साहेबांना सांगितले होते, परंतु सरांनी माझे ऐकून घेतले नाही" असे शवागाराचे पोस्टमार्टम अटेंडट म्हणून काम करणारे प्रकाश नार्वेकर याने सांगितले. मयत जानूझच्या कुटुंबियांसमोर ते गोमेकॉचे डीन प्रदीप नाईक यांना सांगत होते. परंतु ते सांगत असतानाच त्यांच्यावर डोळे वटारून आणि आवाज चढवून त्याला गप्प बसविण्याचा प्रयत्न विभाग प्रमुख रिबेलो यांनी केला. परंतु त्यावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यात हे दृश्य टीपले गेले.
नातेवाईकांच्या दबावामुळे या कर्मचाऱ्याला बोलावेच लागले आणि सत्य बाहेर आले. विभाग प्रमुख रिबेलो याच्याच निष्काळजीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे ही घटना घडल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनाही ही गोष्ट ठाऊक आहे. परंतु या प्रकरणात विभागप्रमुखाबरोबरच त्या कर्मचाऱ्यालाही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. तपासानंतर कोण दोषी व कोण निर्दोषी हे स्पष्ट होईलच असे त्यांनी म्हटले आहे.
हळदोणा येथील जानूझ गोन्साल्वीस या 24 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची शवचिकित्सा करून तो शवागारात ठेवण्यात आला होता. शनिवारी त्याच्या कुटंबाने मृतदेह ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली तेव्हा शवागरात मृतदेहच नसल्याचे आढळून आले. शवागरातील सुमारे दहा अज्ञात मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली त्यात युनूसच्या मतृदेहाचाही समावेश करण्यात आल्याचे नंतर आढळून आले. अशा प्रकारची लाजिरवाणी घटना गोमेकॉत पहिल्यांदाच घडली आहे.