साळ : पणजी आगारातील ‘साखळी-आई-वजरी-दोडामार्ग’ प्रवास करणाऱ्या कदंब बसमध्ये एका महिलेच्या मंगळसूत्रातील सोन्याचा मुहूर्तमणी हरवला. त्या बसच्या वाहकाने सापडलेला मुहूर्तमणी प्रामाणिकपणे परत केला. रमेश प्रभाकर बायकर (रा. खालचावाडा-साळ) असे त्यांचे नाव आहे. याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.
कदंबच्या बसमध्ये (जीए ०३ एक्स ०५१८) प्रणाली पांडुरंग हरवळकर (रा. आई दोडामार्ग) यांच्या गळ्यातील मंगळसूत्रातून मुहूर्त मणी हरवला. त्यांनी दिवसभरात फिरलेल्या ठिकाण शोधाशोध केली. अखेर प्रणाली यांनी बसमध्ये दागिना हरवल्याचे वाहक बायकर यांना सांगितले. बायकर यांनी मुहूर्तमणी मिळाला आहे असे सांगितल्यावर प्रणाली यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. बायकर यांनी हा मणी पणजी आगारात जमा केला होता. तसेच आपले सहकारी, कदंबमधील कर्मचाऱ्यांना या मणीबद्दल कल्पना दिली. त्यानंतर प्रणाली यांनी मुहूर्तमणीची ओळख पटवून दिल्यानंतर पणजी आगार प्रमुख अमर देव व टीसी प्रशांत तारी, वाहक बायकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
प्रामाणिकपणा टिकून दरम्यान, वाहक रमेश बायकर यांच्या प्रामाणिकपणाची चुणूक यापूर्वीही दिसली आहे. यापूर्वी पणजी-मडगाव मार्गावर बसमध्ये एका व्यक्तीची दिड लाख रुपये किमतीची बॅग विसरली होती. ती बॅग बायकर यांनी आगारात जमा केली. संबंधीतांची ओळख पटवून ती सुपूर्द करण्यात आली.