म्हापसा - प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बार्देस तालुक्यातील कामुर्ली पंचायत क्षेत्रात सॅन्ड माफियांकडून बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप या पंचायतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. प्रशासनातील विविध खात्यांच्या नजरेला हा प्रकार आणून सुद्धा त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यावर वेळीच आवर न घातल्यास केरळ, तामिळनाडूसारखी परिस्थिती उद्भवण्यास वेळ लागणार नसल्याचे मत पंचायतीकडून व्यक्त करण्यात आले आहे.
सात पंचसदस्य असलेल्या या पंचायतीचे सरपंच विशांत गावकर, उपसरपंच दिव्या परब, पंचसदस्य तुषार नाईक, शरद गाड, दशरथ हळर्णकर तसेच अभय पेडणेकर उपस्थित होते. या प्रश्नावर स्थानिक आमदार नीळकंठ हळर्णकर हे गप्प असून प्रश्नावर तोडग्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्याचा तसेच गरज पडल्यास हरित लवादात सुद्धा जाण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती सरपंच विशांत गावकर यांनी दिली.
ज्या भागात रेती उत्खनन सुरू आहे तो भाग अतिसंवेदनशील भाग आहे. ज्या प्रमाणावर सध्या उत्खनन सुरू आहे ते पाहता तेथील जलसंपदेवर परिणाम होणार असल्याचा इशाराही यावेळी दिला. भागातील नदीला लागून असलेला बांध सुद्धा कमकुवत झाला असून त्यातील शेती व्यवसायावर सुद्धा परिणाम होण्याची भीती गावकर यांनी व्यक्त केली. मच्छीमारी सुद्धा बंद करण्याची पाळी आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
15 वर्षांपूर्वी कुचेली भागात फक्त दोन व्यावसायिक होते. आजच्या घडीला अगणित असे व्यावसायिक तयार झाले आहेत. दिवसाला किमान दीडशे ट्रक रेती वाहतूक या भागातून केली जात असल्याची माहिती दिली. ज्यावेळी सरकारी अधिकारी तपासणीसाठी किंवा छापा मारण्यासाठी येतात त्यावेळी त्यांना आगाऊ कल्पना दिली जात असल्याने तेथील व्यवसाय बंद ठेवली जातो. हा प्रकार फक्त प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच होऊ शकते असेही ते म्हणाले.
उत्खननाचे विपरीत परिणाम गावावर व्हायला लागले आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असून शांतता भंग होण्याच्या मार्गावर असल्याचे गाड म्हणाले. होत असलेल्या वाहतुकीमुळे गावातून वाहने चालवणे सुद्धा कठीण झाले आहे. मुलांच्या अभ्यासावर, जेष्ठांवर सुद्धा परिणाम व्हायला लागल्याची माहिती यावेळी दिली.
या मुद्यावर नदीच्या दुसऱ्या बाजूला पेडणे तालुक्यात असलेल्या पार्से पंचायतीने विशेष ग्रामसभा घेवून सदर प्रकाराला विरोध केला होता. कामुर्ली पंचायतीने सुद्धा ग्रामसभेतून विरोध दर्शवून कसलाच फायदा झाला नसल्याची माहिती सरपंच विशांत गावकर यांनी दिली. काही लोक मात्र पंचायतीवर दोषारोप करु लागले असून अशा प्रकारावर नियंत्रण ठेवणे पंचायतीच्या आवाक्या बाहेरील असल्याची माहिती पत्रकारांना दिली.