पणजी : गोव्यात एकमेव असलेली व प्रायोगिक तत्त्वावर आणलेली इलेक्ट्रिक बसगाडी गेले तीन महिने सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाने राज्यातील सर्व प्रमुख मार्गावर चालवून पाहिली आहे. या बसगाडीमुळे महामंडळ प्रभावित झाले आहे. या बसवरील खर्चाचे प्रमाण हे फक्त 30 टक्के आहे.
कदंब महामंडळाच्या अन्य विविध प्रकारच्या बसगाड्या दिवसाला 535 फेऱ्या मारतात आणि 24 तासांत सरासरी 18 हजार लिटर इंधन त्या बसगाड्यांकडून खर्च केले जाते. या उलट इलेक्ट्रिक बसगाडी ही फक्त बॅटरी चार्ज केली की चालते. रोज रात्री चार तास बॅटरी चार्ज करावी लागते. या बसगाडीमुळे प्रदूषण होत नाही. गाडीला इंजिन नाही. डिझेलची गरज नाही. गाडीतून धूर येत नाही. पणजीहून मडगाव, काणकोण, साखळी, डिचोली, पेडणे अशा सर्व मार्गावरून या इलेक्ट्रिक बसगाडीनं प्रवाशांना घेऊन प्रवास केला आहे. अजूनही विविध मार्गावर या गाडीचा वापर सुरू आहे. गेल्या 30 जानेवारी रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रिक बसगाडीचे उद्घाटन केले होते. मुख्यमंत्री,वाहतूक मंत्री व इतरांनी पणजी ते बांबोळीपर्यंत या बसगाडीने त्यावेळी प्रवासही करून पाहिला आहे.
महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घाटे यांनी सोमवारी (23एप्रिल)'लोकमत'ला सांगितले, की इलेक्ट्रिक बसगाडी ही कदंबला खूपच उपयुक्त ठरली आहे. भविष्यात या बसगाडीवरील खर्चाचे प्रमाण 25 टक्क्यांवरही येईल. चढावावर देखील ही बसगाडी ब-यापैकी धावते. काही तक्रार नाही. महामंडळाने ही बसगाडी विकत घेतलेली नाही. हैद्राबाद येथील एका कंपनीने ती प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी कदंबला दिली. तिचा वापर सुरू आहे. गाडीच्या देखभालीवर काहीच खर्च येत नाही. भविष्यात कदंबकडे अशा प्रकारच्या जास्त बसगाड्या असतील.
दरम्यान, कदंब महामंडळ यापुढील काळात वेगवेगळ्य़ा प्रकारच्या एकूण शंभर बसगाडय़ा खरेदी करणार आहे. एकूण पंचेचाळीस कोटींचा निधी त्यासाठी सरकार देणार आहे. महामंडळ यापुढे सरकारला प्रस्ताव पाठवणार आहे.