समीर नाईक, पणजी: गुजरात येथे आयोजित व्हायब्रेट ग्लोबल समिट २०२४ मध्ये गोवा उद्योग विकास महामंडळाने सहभाग घेतला. उद्योग संघटना असोचेमच्या सहकायनि तेथे आयोजित उद्योग वाढ, संधी, आकांक्षा या विषयावर परिसंवादात गोव्याचे उद्योगमंत्री मावीन गुदिन्हो यांनी उपस्थित राहून गोव्यात उद्योगासाठी असलेल्या विविध सवलतींची माहिती दिली. तसेच पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त उद्योगांनी गोव्यात यावे असे आवाहन केले.
यावेळी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या सीईओ स्वेतिका सचन,उद्योग संचालनालय संचालक एग्ना क्लीटस यांनीही सहभाग घेतला. उद्योग भागधारकांना गोव्याला उद्योगासाठी अनुकूल स्थळ बनवणे, या विषयावर सचन यांनी पीपीटी सादरीकरणाने उपस्थितांना संबोधित केले. तसेच राज्यातील गुंतवणूक संधींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रोत्साहन योजना आणि अनुदान योजनांचे प्रदर्शन केले.
उपस्थित उद्योग क्षेत्रातील नामवंत भागधारकांना संबोधित करताना मंत्री मावीन गुदिन्हो यांनी उद्योग विकास महामंडळाच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर प्रकाश टाकला व राज्यात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध असल्याची माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर असोचेम गोवा विकास परिषदेचे अध्यक्ष मांगिरीश पै रायकर, गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष पथिक एस. पटवारी आणि गोवा मुख्यमंत्र्यांचे सहसचिव तुषारकुमार जोशी उपस्थित होते.