- किशोर कुबल पणजी - गोव्यातील सरकारी शाळांमध्येइंटरनेट कनेक्टिव्हिटी ३६.७ टक्के असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. राज्यसभेत देण्यात आलेल्या उत्तरानुसार गोव्यातील सरकारी शाळांमधीलइंटरनेट कनेक्टिव्हिटी २०१७-१८ मधील १०.८ टक्क्यांवरून २०२१-२२ मध्ये ३६.७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. गोव्याची इंटरनेट कनेक्टिव्हिटीची टक्केवारी राष्ट्रीय सरासरी २४.२टक्क्यांपेक्षा लक्षणीय असली तरी ती दिल्ली, चंदीगड आणि पुद्दुचेरी सारख्या राज्यांपेक्षा खूपच कमी आहे ज्यात सरकारी शाळांमध्ये १०० टक्के इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे.
कोविड काळात शाळा बंद राहिल्या. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आणि विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आले. परंतु गोव्यात सत्तरी, सांगे, केपें, काणकोण तालुक्यांमधील ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीअभावी मुलांच्या शिक्षणात व्यत्यय आला. ही परिस्थिती सुधारण्यासाठी नंतर ब्रॉडबॅंड कनेक्टिव्हिटी, टॉवर्स वगैरे उभारले त्यामुळे काही भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारली आहे.